

बालोद्यान
एकनाथ आव्हाड
ए पेरुड्या, काय रस्ताबिस्ता चुकलास की काय... खुशाल तोंड वर करून आमच्या महागड्या फळात सामील व्हायला आलास. ध्यानच हाईस की लेका तू. हूँ...म्हणे मालक घेऊन मला आला इथे. मी आपणहून तुमच्यात कशाला येऊ. वा रं वा..! बोलायला टकराघूच दिसतोयस की आणि नशीबच आमचं म्हणायचं, तुला एवढं तरी कळलं ते. अरे, आम्ही सीताफळं.... चांगली किलोकिलोवर विकली जातो. आम्हाला विकत घेणं कोण्या येरागबाळ्याचं काम नव्हे आणि तुला तर इथं पोरंसोरं खिशातला रुपया, दोन रुपयाचं नाणं टाकून विकत घेतात. एका फटक्यात तुझा चट्टामट्टाबी करतात. आम्हाला बघ बरं, कसं निवांत आस्वाद घेत घेत तोंडातून आमच्या बिया बाहेर टाकत टाकत सावकाश खावं लागतं.
काय म्हणालास, तू स्वस्त फळ असलास तरी लोकप्रिय फळ आहेस. तुझा कुठलाही भाग टाकाऊ नाही. बियांसह तुला खाल्लं जातं. लोकाचं पोट भरतं....ये बाबा, आता डोक्यात नको जाऊ माझ्या. तुझ्या तोंडाचा पट्टा चालवणं आधी बंद कर. का उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्हा छोट्या लोकांना मोठ्ठेपणा गाजवायची वाईट सवयच असते म्हणा. पण ही तुझी महानता ना, तुझ्याच जवळ ठेव. माझ्याकडे तुझं ज्ञान पाजळवू नकोस. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. काय म्हणालास, मी आतून काळ्या काळ्या बियांनी भरलेला आणि बाहेरून डोळ्या डोळ्या खवल्यांनी धरलेला... मी कसलं महागडं फळ. पण मी म्हणतो, माझ्या एरियात येऊन मलाच नावं ठेवायला तुझं धारिष्ट्य झालंच कसं म्हणायचं. अरे माझ्यासारख्या सीताफळाचं महत्त्व तुला काय कळणार रे पेरुड्या. सीताफळ खाल्ल्यानं अंगातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती येते. माझ्या काळ्या काळ्या बियांभोवती जो सफेद सफेद आणि गोड गोड गर असतो ना तो मस्त आणि पौष्टिक असतो. ज्याचं वजन वाढत नसेल त्यांच्यासाठी सीताफळ हे अत्यंत उत्तम फळ. मांसवृद्धी होते. पण तुझ्यासारख्या स्वस्तातल्या फळाला हे थोडीच कळणार. छोट्यांचे विचार छोटेच असतात, हेच खरं.
काय म्हणतोस, तुझे विचार छोटे असले तरी काम मोठे आहे. जीर्ण मलावरोधाने त्रासलेल्या लोकांसाठी पेरू आशीर्वादरूप आहे? पेरू खाल्ल्याने लोकांची या त्रासातून सुटका करतोस? हे नव्हतं माहीत बाबा मला. पण उपाशीपोटी पेरू खाल्ल्याने पोटात वायू होतो हे मात्र माहितीय मला. अरेच्चा, म्हणूनच तू ऊठसूठ सांगत असतोस का, पेरू खाताना मीठ आणि मिरे, जिऱ्याची पूड फोडीवर घालून खात जा म्हणून. अच्छा, त्यामुळे वातुळपणा कमी होतो होय. पण तू कित्ती वटवट करतोस रे. इथं डोकं उठलंय माझं. बोलून बोलून तुझं तोंड नाही दुखत? तू असं कर, तुझा आपला गाशा गुंडाळ आणि चालू पड बरं इथून. काय म्हणतोस, डोकं दुखतंय तर, अर्धवट कच्चा पेरू पाण्यात उगाळून कपाळावर दुखत असलेल्या भागावर त्याचा लेप लावल्यास दोन-तीन तासात डोकं दुखायचं थांबतं? अर्धशिशी दूर होते? कमालच आहे की तुझी. काय.. काय? काय अवगुण आहेत रे माझे? सांगा की बृहस्पती. आँ.... अति सीताफळ खाल्ल्याने थंडी वाजून येते म्हणूनच मला ‘शीताफळ’ म्हणतात? होय..खरं आहे ते. मी म्हणतो, सर्दी असेल त्यांनी कशाला खावं मला.
बरं ते जाऊदे, ए पेरूदल्या, तू मघाशी मला माझ्या काळ्या काळ्या बियांबद्दल आणि डोळ्या डोळ्यांच्या सालीबद्दल हिणवत होतास ना. पण लक्षात ठेव, माझ्या कच्च्या फळाच्या बीचे चूर्ण केसांना लावल्याने उवा नष्ट होतात. पण हे चूर्ण डोळ्यांत जाणार नाही याची खास दक्षता मात्र घेतली पाहिजे आणि माझ्या पिकलेल्या सीताफळाच्या सालीमध्ये जखम सुकविण्याचा व जीवजंतू नष्ट करण्याचा गुण आहे, हे ठाऊक आहे का तुला? का नुसते दुसऱ्यांना कमी लेखून आपल्याच मोठेपणाचे गोडवे गात बसायचे. काय म्हणालास, खूपच महत्त्वाचं सांगितलं मी? असू दे, असू दे. माझं महत्त्व कळलं तुला, याचा आनंद आहे मला. वैज्ञानिक सांगतात होय, की तुझ्यात जीवनसत्त्व क, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ग्लुकोज, टॅनिन ॲसिड हे मुबलक आहेत म्हणून. जीवनसत्त्व ‘सी’चे प्रमाण तुझ्यात जास्त असल्याने दंतरोग, दुर्बल पचनसंस्था, रक्तदाब, रक्तविकार दूर होण्यास तुझी मदतच होते होय? व्वा. फारच छान की!
तू सुद्धा तुझी मस्तच माहिती दिलीस की.
अरे पण पेरवा, काय योगायोग बघ. माझ्यातही कॅल्शिअम, लोह व जीवनसत्त्व क आहेच की! म्हणजे आपण दोघंही समाजाच्या उपयोगी पडणारी फळंच. कशाला मग आपण एकमेकांची उणीदुणी काढून भांडतोय. गुण्यागोविंदानं एकत्र आनंदात राहूया की.
अरे पेरूदा, तिकडं बघ. आलं वाटतं कुणीतरी आपला भाव विचारायला. आपल्या दोघांनाही कुणीतरी एकत्र विकत घेतलं तर किती बरं होईल नाही. तेवढाच अधिक वेळ आपण एकत्र राहू. त्यांच्या पिशवीत बसून मस्तपैकी आनंदाने गप्पा मारू. खरंच पेरू, आज आपल्या निष्फळ भांडणाचं पर्यवसान गोड मैत्रीत झालं याचं सारं श्रेय तुला आणि तुझ्या समजूतदारपणाला. काय म्हणालास? याचं श्रेय त्या विधात्याला? बरं बाबा, तू म्हणशील तसं. ज्यानं ही सुंदर सृष्टी निर्माण केली आणि चांगला विचार करण्याची, चांगलं पाहण्याची आपल्याला दृष्टी दिली, त्या विधात्याला याचं श्रेय आपण देऊ. काय, अगदी खरं आणि माझ्या मनातलं बोललोय मी. n
साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक