सिनेरंग
पूजा सामंत
तुकोबाराय हे केवळ संत नव्हते, तर समाजात परिवर्तन आणण्यासाठी तळमळणारे सुधारक होते. आपल्या अभंगातून ते तत्कालिन कर्मकांडावर प्रहार करत होते. अशी ही आगळी व्यक्तिरेखा सुबोध भावे यांनी आपल्या अभिनयातून जिवंत केली आहे.
प्रख्यात अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सुबोध भावे याचा हिंदी चित्रपट ‘संत तुकाराम’ नुकताच १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला. यात सुबोधने संत तुकारामांची व्यक्तिरेखा साकारली आहे. सुबोध आणि बायोपिक हे एक समीकरणच आता झालेले आहे. सुबोधने रंगवलेल्या ठळक चरित्र व्यक्तिरेखा म्हणजे लोकमान्य टिळक, बाल गंधर्व, डॉक्टर काशिनाथ घाणेकर आणि कट्यार काळजात घुसली. इतक्या विविध छटा असलेल्या व्यक्तिरेखा सुबोधने रंगवलेल्या असल्याने आता तो रंगवत असलेल्या संत तुकारामांच्या व्यक्तिरेखेबद्दल भलतीच उत्सुकता निर्माण झाली आहे. संत तुकारामांच्या चरित्राचं हिंदी भाषेत सादरीकरण होत आहे, ही आणखी एक विशेष बाब. सध्याच्या मराठी-हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर ती अधिक महत्त्वाची ठरत आहे.
म्हणूनच सुबोध आणि त्याच्या विविध व्यक्तिरेखा, त्याची आजवरची वाटचाल याविषयी सुबोधशी झालेली ही मनमोकळी बातचीत -
प्रदीर्घ कालावधीनंतर हिंदी चित्रपट करण्यामागे काही विशेष प्रयोजन?
“संत तुकाराम’ हिंदीमध्ये साकारण्याची उत्तम संधी चालून आली, मग ती का स्वीकारू नये ? एक अमराठी निर्माता आणि अमराठी दिग्दर्शक या दोघांनी हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. तुकारामांची पूजनीय, वंदनीय व्यक्तिरेखा मला मिळत असेल तर मी ती स्वीकार करावा हे स्वाभाविकच आहे . ‘संत तुकारामां’बद्दलची एक आठवण इथे सांगावीशी वाटते. आजपासून साधारण २५ वर्षांपूर्वी मला ‘संत तुकाराम’ नावाचाच एक मराठी चित्रपट ऑफर झाला होता. या चित्रपटाची कथा प्रख्यात साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी लिहिली होती. माझाही तो अभिनयातील उमेदवारीचा काळ होता. या ऑफरचा खूप आनंद झाला होता. कारण समस्त महाराष्ट्राचे लाडके असलेले संत तुकाराम यांच्यावरचा हा चित्रपट होता आणि तो माझ्या वाट्याला येत आहे, या भावनेने मी भारावलो होतो. पण ही संधी हुकली! चित्रपट पुढे बनला नाही. त्यानंतरही तुकोबांच्या जीवनावरचे चित्रपट मला एकदा नाही तर पाच ते सहा वेळा ऑफर झाले.पण या ना त्या कारणांनी संधी हुकली आणि आता पुन्हा अखेरीस तुकोबांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली. चित्रपटही पूर्ण होऊन आता रिलीज झाला आहे. एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आभास होतोय मला.”
तुकोबारायांची व्यक्तिरेखा साकारणे ही तशी मोठीच जबाबदारी होती. कशी तयारी केली आणि कोणती आव्हाने समोर होती?
“महाराष्ट्रातले नामवंत संत होते आपले तुकोबा महाराज! छत्रपती शिवाजी महाराजही त्याच काळातले. दोघेही समकालीन होते, हे आणखी एक वैशिष्ट्य. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून जे सामाजिक परिवर्तन केले त्याला तोड नाही. नुकतीच आषाढी एकादशी पार पडली. त्यावेळचा तो भक्तीचा उत्साह आपण सगळ्यांनी पाहिला. दरवर्षी संपूर्ण देशातून, महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून २० लाखांहून अधिक भाविक मोठया भक्तिभावाने वारीला जातात. मुखाने जयघोष करतात विठू माऊलीचा, तुकोबांचा, ज्ञानोबांचा आणि समस्त संत मांदियाळीचा. आपला देश ईश्वरावर भक्ती असलेल्यांचा, संतांविषयी आस्था असलेल्यांचा देश आहे. म्हणूनच संत तुकाराम यांची व्यक्तिरेखा माझ्याकडे येणे हा मी एक दैवी योग मानतो. या प्रश्नाचे उत्तर देताना आणखी एक बाब मला सांगाविशी वाटते. मी जन्माने पुणेकर आहे. आमच्या कुटुंबाचे शंकराचे मंदीर आहे. माझा जन्म याच स्थळी झाला. माझ्या दिवसाची सुरुवात गणेशाच्या नामस्मरणाने होते. पूजा केल्याशिवाय मी माझ्या घरातून बाहेर पडत नाही. ईश्वराप्रति माझी निःस्सीम श्रद्धा आहे आणि संतांच्या चरणी लीन झाल्यावर आयुष्याचे खडतर मार्ग सुकर होतात, हा माझा विश्वास आहे. ईश्वराचे रूप म्हणजे संत. दिग्दर्शक आदित्य ओम यांनी अतिशय सोप्या भाषेत स्क्रिप्ट लिहिली आहे. ही स्क्रिप्ट आम्ही सर्व कलाकारांनी फॉलो केली.
सुबोध, तुम्ही सातत्याने बायोपिक म्हणजे चरित्र चित्रपट करत आला आहात. तुकोबांवरचा हा चित्रपट करण्यामागे चरित्र साकारण्याची ही प्रेरणा होती का?
“बाल गंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर असे बायोपिक केल्यांनतर मी बायोपिक मास्टर ठरलो खरा. पण मला फक्त चरित्र व्यक्तिरेखाच द्या.. मी ‘बायोपिक किंग’ आहे, असे काही मी इंडस्ट्री मध्ये कुणाला सांगत नाही. ज्या चरित्र व्यक्तिरेखा माझ्याकडे आल्या त्यांना मी माझ्या परीने न्याय दिला. व्यक्तिरेखा आव्हानात्मक असली की मी त्यातील नाविन्य शोधतो. वेगळेपणा शोधतो. त्या व्यक्तिरेखेचे वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो. फक्त बायोपिक आहे म्हणून चित्रपट स्वीकारतो, असे म्हणणे अयोग्य ठरेल. संत तुकोबांवर आतापर्यंत मला किमान सहा वेळा वेगवेगळे चित्रपट ऑफर झाले होते, पण काही ना काही कारणांनी त्या त्या वेळेस ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी हुकत गेली, जी आता हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा लाभली आहे.”
आजवरची अभिनयातील वाटचाल कशी झाली? समाधानी आहात का?
“पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात मी जन्मलो. नूतन मराठी विद्यालयात शिकून पुढे सिम्बॉयसिस महाविद्यालयात पदवी घेतली. या दरम्यान अभिनयाच्या ज्या संधी लाभल्या त्या घेतल्या, नोकरी मिळाली ती देखील केली. अभिनयाविषयी खूप ओढ निर्माण झाली आणि पुढे मी पुण्याहून मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. एका मागोमाग एक योग्य भूमिका मिळत गेल्या. ८० चित्रपट, किमान ३५ मालिका आणि दहाच्या आसपास नाटकं केलीत. बालगंधर्व यांची व्यक्तिरेखा साकारताना त्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत केली. चालण्याचा, पळण्याचा व्यायाम करतानाच, मला स्त्रीसारखे चालता-वावरता यायला हवे, याचाच सतत ध्यास होता. माझी प्रत्येक हालचाल सतत पडताळून पाहत होतो. वडे, सामोसे, पिझ्झा या सगळ्या वजन वाढवण्याऱ्या पदार्थांपासून पूर्ण फारकत घेतली. गोड पदार्थ पूर्ण वर्ज्य केलेत. सॅलडलाच डिनर मानत असे. दोरीच्या उड्या, जिमचे वेट ट्रेनिंग, वॉकिंग, जॉगिंग.. काहीही करायचे शिल्ल्लक ठेवले नाही त्या काळात. गंधर्वांची व्यक्तिरेखा रंगवायची म्हणजे गाता आले पाहिजे, आवाजात, चेहऱ्यात गोडवा पाहिजे. त्याकाळात माझ्या खूप लुक टेस्ट झाल्यात, पण मी त्यात अनुत्तीर्ण व्हायचो! खूप निराशेने गाठले मला त्या काळात. मी स्वतःशीच विचार करु लागलो की, मी वजन कमी केलं आहे, बारीक दिसतोय, पण वजन कमी करणे म्हणजे माझे बालगंधर्व होणे आहे का ? अभिनय करतोय असे न वाटता मी ‘बालगंधर्व’ दिसलो पाहिजे... काया-वाचा-मने मी बालगंधर्व दिसलो पाहिले.. गंधर्वांचा आत्मा माझ्यात उतरावा म्हणून मी सगळी दिव्यं केली, पण यात माझी घुसमट खूप वाढत गेली. मी मनाने तडफडत होतो. डोकं सुन्न झाल्याने माझ्या लुक टेस्टमध्ये माझ्या चेहऱ्यावरचा तणाव दिसत असे. खूप दडपण आले होते माझ्यावर त्या काळात. तो सगळा प्रवास दमवणारा होता. अनेकदा वाटले सगळे सोडून द्यावे. पण मला दिशा सापडली ती परुळेकर मास्तरांमुळे. त्यांनी वेळोवेळी धीर दिला. माझी तयारी नेटाने करून घेत गेले आणि मी नव्या उमेदीने उभा राहू लागलो! स्त्री होणे सोपे नाही, हे बालगंधर्वांच्या व्यक्तिरेखेमुळे लक्षात आले.
मी बायोपिक्सचा किंग आहे असे जे म्हणतात त्यांना मी विनयाने सांगेन की, लोकमान्य टिळक, बालगंधर्व, डॉक्टर घाणेकर अशा सगळ्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वांपासून मी जीवनाचे पाठ घेतलेत. संघर्ष कुणालाही टळलेला नाही हे शिकलो. यातून मीच घडलो..पुढे जात राहिलो..निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या मी कशा आपोआप पार पडत गेलो..माझ्या प्रवासात भेटलेल्या व्यक्तिरेखांनी माझा विकास कसा घडवला..माझ्या प्रवासातल्या अशा अनेक अंसग व्यक्तींना माझा नमस्कार!”