महाराष्ट्र

अजितदादांचा वादा; राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणीला आता २१०० रुपये, जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

विधानसभा निवडणुकीत बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार यांना विजयी करण्यासाठी शरद पवार यांनी स्वतः मोर्चा सांभाळला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामतीत जबरदस्त रणनीती आखली आहे.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीत बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार यांना विजयी करण्यासाठी शरद पवार यांनी स्वतः मोर्चा सांभाळला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामतीत जबरदस्त रणनीती आखली आहे. मतदानाला काही दिवसच शिल्लक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी पक्षाच्या प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात बारामतीकरांवर घोषणांचा पाऊस पाडला आहे.

लाडकी बहीण योजना पुढेही सुरूच राहणार असून आता पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. जागतिक क्रीडा संकुल, कॅन्सर रुग्णालय, लॉजिस्टिक पार्क, सौर ऊर्जा प्रकल्प उभारून बारामतीच्या प्रगतीचा नवा आलेख गाठणार, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा शरद पवार यांनी बारामती काबीज करण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनीही बारामतीत नवनवीन घोषणांचा पाऊस पाडला आहे. अजित पवार यांच्या घोषणांचे परिवर्तन मतांमध्ये किती होते हे निकालानंतर स्पष्ट होईल. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बुधवारी मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात ११ नवीन आश्वासने समाविष्ट करण्यात आली असून अजित पवारांनी बारामतीतून तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुंबईतून तो जाहीर केला.

लाडकी बहीण योजना, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, ५२ लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षण, गरीब, मध्यमवर्गीय, युवक, महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजनांचा यामध्ये समावेश आहे. या योजनांना फार मोठा प्रतिसाद राज्यातील कानाकोपऱ्यातून मिळाला आहे. विशेष म्हणजे या सर्व योजनांतून कुटुंब असेल किंवा युवक, महिला-भगिनींना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजना जनतेच्या मनात खोलवर गेल्या आहेत, असेही सुनिल तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, महायुतीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यात बदल घडवणाऱ्या योजना जाहीर केल्या. त्या योजना घोषित न करता त्या योजनांची अंमलबजावणी कसोशीने करण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारने उत्तम पध्दतीने केला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, स्टार प्रचारक सयाजी शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे आदी उपस्थित होते.

सरकार सत्तेत येताच नवीन महाराष्ट्र व्हिजन

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून बारामतीसाठी वेगळा आणि पक्षाचा राज्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच लढवत असलेल्या ५० मतदारसंघांसाठी पक्षाचा वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी, सरकार स्थापनेनंतर १०० दिवसात नवीन महाराष्ट्राचे व्हिजन जाहीर करु, असे सांगितले.

नंबर डायल करा मतदारसंघातील घोषणांची माहिती मिळवा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमारे ३६ पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर 'महाराष्ट्रवादी घोषणापत्र' असे छापण्यात आले आहे. तसेच मतदारांना आपल्या मतदारसंघातील विकासकामे आणि घोषणापत्रांच्या माहितीसाठी ९८६१७१७१७१ हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. हा नंबर डायल करताच आपल्या मतदारसंघातील विकास कामे व घोषणांची माहिती मिळणार आहे.

अजित पवारांचे घोषणापत्र

- लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची वाढ

- शेतकरी कर्जमाफी

- भात शेतकऱ्यांसाठी २५ हजार प्रति हेक्टर बोनस

- अडीच लाख नोकऱ्या

- ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम

- अंगणवाडी आणि आशा वर्कर कर्मचाऱ्यांना १५ हजार मासिक वेतन

- सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देत वीजबिल ३० टक्के कमी

- २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश

- वृद्ध पेन्शनधारकांना आता पंधराशेऐवजी महिन्याला २१०० रुपये

- दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी