भास्कर जामकर/नांदेड
संविधान म्हणजे गौतम बुद्ध, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांचे विचार आहेत. त्याला कोरे म्हणणे म्हणजे या देशातील नागरिकांचा अपमान आहे, तो अपमान पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. आरएसएस आणि भाजपला संविधान मान्य नाही. त्यांचे बंद खोलीत लपून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, संविधान वाचविण्यासाठी आमची लढाई सुरू आहे, आणि ती पुढे पण चालूच राहणार आहे, पंतप्रधान मोदी यांनी उभ्या आयुष्यात संविधान वाचले नाही; ते सर्वात श्रीमंत २५ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतात. परंतु, शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाहीत, असा हल्लाबोल लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत गुरुवारी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व आरएसएसवर जोरदार टीका केली.
नांदेड लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावर खासदार राहुल गांधी यांची गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजता जाहीर सभा झाली. यावेळी तेलंगनाचे मंत्री शब्बीर अली, सचिन पायलट, पक्ष निरीक्षक व जहिराबादचे खासदार सुरेश शेटकार, काँग्रेसच्या सचिव जरीता, रजनी पाटील, सूर्यकांता पाटील, लोकसभेचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण, डॉ. माधवराव किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेश पावडे, नायगाव विधानसभा उमेदवार डॉ. मीनल खतगावकर, नांदेड उत्तरचे अब्दुल सत्तार आदींची उपस्थिती होती.
ते पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, धारावीतील जमीन उद्योजक गौतम अदानी यांना पाहिजे होती. त्यामुळेच राजकीय बैठकीस बसले होते. त्यांना एक लाख कोटी रुपयांचा फायदा करून दिला. त्यांच्यासाठीच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. महाराष्ट्रातील सरकार मोदी चालवतात. वेदांता प्रकल्प सरकारने गुजरातला दिला. दहा हजार युवकांना त्यातून रोजगार भेटला असता. नोटाबंदी, जीएसटी लागू केली. व्यापारी, शेतकरी देशोधडीला लागला. ही विचारधारेची लढाई आहे. संविधानाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
महिलांना मोफत प्रवास,शेतकऱ्यांची कर्जमाफी
आमचे सरकार आल्यानंतर महिलांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रूपये त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करणार, त्यांना महाराष्ट्रभर बस प्रवास मोफत, शेतकऱ्यांचे ३ लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार, शेतमालाला हमीभाव, १६ लाख तरुणांना नोकऱ्या देणार, रोजगार मिळेपर्यंत तरुणांच्या खात्यावर दर महिन्याला चार हजार रुपये, तसेच लोकसभा, राज्यसभेमध्ये जनगणना करण्यास भाग पाडणार, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आम्ही करून दाखवणार, असे खासदार राहुल गांधी म्हणाले.
नरेंद्र मोदींचे मीडिया प्रेम सर्वश्रुत
सभेदरम्यान, राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांवरही जोरदार टीका केली. मीडिया नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत, ते गोदी मीडिया आहेत. आमचे नाहीत तरी, त्यांना मला नाइलाजाने मित्र म्हणावे लागते. मी काय बोललो यावरच त्यांची सायंकाळच्या बैठकीत चर्चा होते. ठराविक समाजातील लोकच या ठिकाणी असतात. तसेच या मीडियामध्ये मागसवर्गीय, आदिवासी, दलित समाजातील तरुणांचा समावेश आहे का? अशी विचारना करत इतर कॉर्पोरेटमध्येही हा समाज नसल्याची यादी आपल्याकडे आहे, अशी मुक्ताफळेही राहुल गांधी यांनी नांदेड येथे वाहिली.
बसस्थानकावर प्रवाशांशी साधला संवाद
सभा आटोपल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांचा ताफा अचानक नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानकात वळाला. त्यांनी बसस्थानकातील एका हॉटेलवर उसाच्या रसाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी स्वतःच्या खिशातून विक्रेत्याला दहा जणांचे २०० रुपये दिले. तसेच काही महिला प्रवाशांसोबत संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्या ठिकाणी एकच गर्दी झाली होती. दरम्यान, काही काळ बससेवा ठप्प झाली होती. तसेच यासंबंधी पोलीस प्रशासनास माहिती नसल्याने त्यांची एकाच तारांबळ उडाली होती.