छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघातून आपण आपल्या इच्छेविरुद्ध निवडणूक लढविली, अशी स्पष्ट कबुली भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी येथे दिली. मात्र या निवडणुकीत पराभूत झाल्याचे आपल्याला शल्य नाही, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) नेते धनंजय मुंडे यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान पंकजा पुढे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन करताना आपल्याला आपला निरोप समारंभ असल्यासारखे वाटत आहे. आपण जबाबदारीतून मुक्त होत आहोत. परळीमध्ये पंकजा यांनी दिवाळी स्नेहमिलन आयोजित केले होते. तेथे रविवारी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
लोकसभेची निवडणूक आपण आपल्या इच्छेविरुद्ध लढलो, त्यामध्ये पराभूत झाल्यानंतर आपण रडत बसलो नाही, मात्र आपण पराभूत झाल्याने कोणीतरी आत्महत्या केली, तेव्हा आपल्याला रडू कोसळले, असे त्या म्हणाल्या.
जनतेच्या मनात कमळ निशाणी!
धनंजय मुंडे हे येथील विद्यमान आमदार आहेत, जनता ईव्हीएमवर भाजपचे कमळ चिन्ह पाहते, जनता मनात कमळ निशाणी ठेवते. मात्र, राष्ट्रवादी (अप) काँग्रेसची निशाणी असलेल्या बटणावर बोट दाबते. जागावाटपामध्ये परळीची जागा धनंजय मुंडे यांच्याकडे गेल्याचे काहीच वाटत नाही. कारण आपण आता विधान परिषदेतील आमदार आहोत, असेही पंकजा म्हणाल्या.