मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी गुरुवारी आपल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडायचे नाही, असा आदेशही त्यांनी दिला. महाविकास आघाडीला १५७ जागा मिळतील, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली. राज्यभरातून शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मतदानोत्तर चाचण्यांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी या चाचण्यांकडे विशेष लक्ष देऊ नका, असा सल्ला आपल्या उमेदवारांना दिला. महाविकास आघाडीच्या १५७ जागा येतील, असे पवार म्हणाले.
जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडायचे नाही आणि जिंकल्यावर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबई गाठण्याची व्यवस्था करून ठेवा, असेही पवारांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांची राहण्याची व्यवस्था मविआकडून करण्यात आली आहे.
शरद पवारांनी १५७ जागा सांगितल्याने उर्वरित जागा या महायुती, अपक्ष आणि इतर पक्षांना जाण्याचा अंदाज लावण्यात येत आहे. सत्तास्थापनेसाठी १४५ जागांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा १२ जागा जास्त महाविकास आघाडीला मिळत असल्याचा दावा पवारांनी केला आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी महायुतीला बहुमत मिळेल, त्यांची सत्ता येईल, असे म्हटले आहे. यामुळे आता नेमके खरे कोणाचे हे २३ नोव्हेंबरलाच समजणार आहे.