कराड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये (पोक्सो) आरोपीस सहा महिने सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी ठोठावली. प्रवीण अरुण चव्हाण असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी प्रवीण चव्हाण याने अल्पवयीन मुलीशी तुझ्याशी मैत्री करायची आहे. तू मला आवडतेस असे म्हणून तिच्याकडे विचारले असता, मुलीने त्याला स्पष्ट नकार देत याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली; मात्र यानंतर आरोपीने स्वतःचे जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली व मुलीचे फोटो वायरल करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी सदर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी कराड शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरून प्रवीण चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली होती. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याची सुनावणी सुरू असताना सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी युक्तीवाद केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद, सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी प्रवीण चव्हाण याला सहा महिने सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.