महाराष्ट्र

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; भाजपने कसली कंबर; मविआत इच्छुकांची मोर्चेबांधणी

पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी भाजपात प्रवेश केल्याने समीकरणे बदलली असून, भाजपमधील इच्छुकांना चाप बसला आहे. मात्र, महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Swapnil S

पुणे : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी आतापासूनच इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत महाविकास आघाडीकडून झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने ही उणीव भरून काढण्यासाठी यंदा पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी भाजपात प्रवेश केल्याने समीकरणे बदलली असून, भाजपमधील इच्छुकांना चाप बसला आहे. मात्र, महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मागील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून अरुण लाड यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात भाजपचे संग्रामसिंह देशमुख, मनसेच्या रुपाली पाटील, जनता दलाचे शरद पाटील, अपक्ष डॉ. श्रीमंत कोकाटे, बहुजन आघाडीचे सोमनाथ साळुंखे असे उमेदवार होते. मात्र, खरी लढत महाविकास आघाडी व भाजपमध्ये झाली. एकूण झालेल्या मतांपैकी २ लाख २८ हजार २५९ मते वैध ठरली, तर तब्बल १९ हजार ४२८ मते अवैध ठरली. विजयासाठी १ लाख १४ हजार १३१ कोटा निश्चित करण्यात आला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्याच फेरीत १ लाख २२ हजारांहून अधिक मते घेत एकहाती विजय मिळवला होता. त्यांचे विरोधक भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना केवळ ७३ हजार एवढी मते मिळाली. लाड यांचा ४८ हजार ८२४ मतांनी विजय झाला.

पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे येतात. भाजपकडून शरद लाड हे इच्छुक आहेत. तर दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि जनसुराज्य पक्षातर्फे अनेक जण इच्छुक आहेत. नव्याने मतदार नोंदणीचा धडाका सुरू झाला आहे. प्रत्येक पक्षाचे गटनेते पदवीधरांची मत नोंदणी अधिक कशी होईल, याकडे लक्ष देत आहेत. आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षात घेऊन भाजपात प्रवेश केला आहे. आता त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळते का ?, याबद्दल औत्सुक्य आहे. आमदार लाड यांच्या जागी महाविकास आघाडीसाठी सध्या तरी शिक्षकेतर संघटनेचे शिवाजीराव खांडेकर हे दावेदार मानले जात आहेत.

कोणाला मिळणार तिकीट ?

आमदार जयंत पाटील यांचे स्नेही व माजी खासदार एस. डी. पाटील यांचे नातू अॅड. धैर्यशील पाटील निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ते शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. मंत्री हसन मुश्रीफ यांचे निष्ठावंत समर्थक प्रताप माने हे या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीलाच जागा मिळावी, यासाठी येथील नेतेमंडळी अग्रेसर आहेत. जनसुराज्यचे सुमित कदम यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मनसेकडूनही काहीजण इच्छुक आहेत. उमेदवारी मिळाली नाही, तर काहीजण अपक्षही लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आतापासूनच रंगत असल्याचे दिसून येत आहे.

Satyacha Morcha Mumbai : काढ रे तो पडदा! राज ठाकरे थेट पुरावा घेऊनच आले; म्हणाले, "त्यांना आधी बडवायचं मग...

Satyacha Morcha Mumbai : उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला...

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटले? रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या

मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर

Andhra Pradesh : एकादशीला भाविकांवर काळाचा घाला; वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी