डॉ. हर्षदीप कांबळे, अनिल डिग्गीकर (डावीकडून) 
महाराष्ट्र

बेस्टमध्ये उचलबांगडी; महाव्यवस्थापक डिग्गीकर यांना कुर्ला अपघात भोवला,महायुती सरकारकडून डझनभर अधिकाऱ्यांच्या बदल्या

‘गतिमान’ सरकार म्हणून जाहिरात केलेल्या महायुती सरकारने शपथविधी, मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब केल्यानंतर आता थेट कामाला सुरुवात केली आहे.

रविकिरण देशमुख

‘गतिमान’ सरकार म्हणून जाहिरात केलेल्या महायुती सरकारने शपथविधी, मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब केल्यानंतर आता थेट कामाला सुरुवात केली आहे. आठ बळी घेणाऱ्या कुर्ला येथील बेस्ट अपघातानंतर चर्चेत राहिलेल्या बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची रवानगी मंत्रालयात दिव्यांग कल्याण खात्याचे अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. त्याचबरोबर फडणवीस सरकारने मंगळवारी एकदम १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या.

कुर्ल्यात अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एलबीएस रोडवर एका भरधाव वेगाने आलेल्या बसने ९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री गर्दीत घुसून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४९ जण जखमी झाले होते. या भरधाव बसने ३०-४० गाड्यांना धडक दिली. या बसचा चालक संजय मोरे यास अटक केली आहे. या अपघातानंतर बेस्टच्या कारभाराचा पंचनामा सर्वत्र झाला. बेस्टच्या प्रशासनावर टीका झाली.

कुर्ल्याचा अपघात व अन्य अपघात पाहता बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्यावर बदलीची कुऱ्हाड कोसळल्याचे बोलले जात आहे. कुर्ला येथील अपघाताचे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले त्यामुळेच त्यांची बदली केल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. १९९७ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांची बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून बदली झाली आहे. ते सध्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव आहेत.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांची बदली वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर, वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांची नाशिक मनपाचे आयुक्त, विक्रीकर सह आयुक्त वनमती. सी. यांची वर्धाचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार यांची मुंबईत विक्रीकर सह आयुक्त म्हणून बदली झाली.

वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यंत पांडा यांची गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. विवेक जॉन्सन यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अण्णासाहेब दादू चव्हाण हे पुणे विभागीय आयुक्तालयात उपायुक्त आहेत. त्यांची बदली महात्मा फुले जीवनदया आरोग्य योजना सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोपीचंद मुरलीधर कदम यांची बदली सोलापूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली आहे.

उद्योग खात्याचे प्रधान सचिव पी. अनबलगन

‘महाजनको’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांची बदली उद्योग खात्याचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. यापूर्वी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉ. राधाकृष्णन बी. यांची ‘महाजनको’त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे.

राज्य ‘रेल्वे फाटकमुक्त’ करण्याचा संकल्प; 'महारेल'च्या ६५ प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Weather Update : मान्सून दोन दिवसांत मुंबईत

कॉकरोच जनता पार्टीचा गुरुवारी पुण्यात एल्गार

Mumbai : धारावीत पहिली घरे २०२८ पर्यंत

इतरांच्या मुलांना मंत्रिपद, तोच न्याय मला लावा; नाराज भुजबळांची भूमिका