मुंबई: मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर मुंबई महापालिकेचे क्रीडा भवन आहे. क्रीडा भवनाच्या जागेवर ३५० आसन व्यवस्था सभागृह उभारण्याची जोरदार हालचाल भाजपने सुरू केली आहे. मात्र, क्रीडा भवनाच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर जास्तीत जास्त २५० नगरसेवक बसतील, असे सभागृह साकारता येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यात क्रीडा भवनाची वास्तू उभी आहे त्या ठिकाणी ३ हजार चौरस मीटर जागा राज्य सरकारची आहे. त्यामुळे अनेक अडथळे दूर केल्यानंतरही २५० नगरसेवक बसतील, असे सभागृह बांधता येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढल्यामुळे मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहाची जागा त्यांना बसण्यासाठी अपुरी पडत आहे. आता मुख्यालयासमोर असलेल्या क्रीडा भवनाच्या जागेवर चार मजली इमारत बांधण्यात येणार आहे. ८० वाहन क्षमता असलेली भूमिगत पार्किंग, अद्ययावत सभागृह, महापौरासाठी स्वतंत्र लिफ्ट अशा सोयीसुविधांसह विधिमंडळाच्या धर्तीवर नवीन सभागृह बांधण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा भवनाच्या जागेवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली.