मुंबई : महाराष्ट्राला फोडाफोडीचे राजकारण जर कुणी दाखवले असेल तर ते शरद पवार यांनीच. या राज्यात अनेक पक्ष फोडले, स्वतः नवीन पक्ष काढला, अनेक घराणी फोडली. घरफोडीचे राजकारण पवारांनीच महाराष्ट्राला दाखवलेय. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राला विचार दिला त्यांच्याबरोबर राहून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पवारांनी केले. ज्यांनी आपले आयुष्य खंजीर खुपसण्यात घालवले त्यांनी दुसऱ्याला गद्दार न बोललेले बरे, अशी टीका भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केली आहे.
काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, काँग्रेसच्या मनात बाबासाहेबांविषयी किंवा दलित समाजाविषयी सातत्याने आकसच राहिलेला आहे. त्यांच्या रक्तात, विचारात बाबासाहेबांचा द्वेष होता. बाबासाहेब उभे असताना त्यांना पराभूत करण्याचे काम याच काँग्रेसने केले. त्यामुळे जे पोटात असते तेच ओठात येते. काँग्रेसला मतांसाठी दलित समाज, बाबासाहेब लागतात. परंतु बाबासाहेबांचे विचार नको आणि समाजाच्या उत्कर्षासाठी काही करायलाही नको हा काँग्रेसचा खरा चेहरा आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, जय भवानी, जय शिवाजी वचननाम्यात आणून उपयोग नाही, तर आचरणात आणायला लागते. छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक त्यांचे विचार सोडले, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राटवरून जनाब करण्यापर्यंत काँग्रेसला साथ दिली. निवडणूक आयोगानेही अशाप्रकारची भूमिका घेतली असावी, असेही दरेकर म्हणाले.