दिवाळी उत्सवाच्या धामधुमीत आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर रविवारी (दि. २१) रात्री एक अनोखी घटना घडली. फतेहाबाद टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस कमी मिळाल्याच्या निषेधार्थ सर्व टोल गेट्स उघडले आणि उपोषणाला बसले. परिणामी, २ तास तब्बल हजारो वाहने टोल न भरता सुसाट निघून गेली. अन् कंपनीला लाखो रुपयांचा महसुली तोटा सोसावा लागला.
नेमकं प्रकरण काय?
फतेहाबाद टोल प्लाझाचे संचालन ‘श्री साई अँड दातार कंपनी’कडे आहे. येथे सुमारे २१ कर्मचारी काम करतात. दिवाळी बोनस म्हणून त्यांना केवळ १,१०० रुपये देण्यात आले, तर मागील वर्षी प्रत्येकी ५,००० रुपये बोनस मिळाला होता. या फरकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून बोनस खात्यात जमा होईल अशी आश्वासने दिली जात होती, मात्र पैसे न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री सुमारे १० वाजता टोल प्लाझावरील बूम बॅरियर्स उघडले आणि धरणे आंदोलन सुरू केले.
वाहने टोल न भरताच सुसाट
धनत्रयोदशीचा दिवस असल्याने एक्सप्रेसवेवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती. टोल गेट्स खुले ठेवण्यात आल्याने सुमारे ५,००० हून अधिक वाहने टोल न भरता गेली. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक कृष्णा जुरैल यांनी सांगितले की, “वाहनांचा वेग जास्त असल्याने फास्टॅग स्कॅनिंग शक्य झाले नाही. त्यामुळे टोल वसुली पूर्णपणे ठप्प झाली.” प्रत्येक कारचा एकतर्फी टोल ६६५ इतका असल्याने, एकूण नुकसान ३० लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
अधिकाऱ्यांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. निषेध करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इतरांना कामावर रुजू होऊ दिले नाही. अखेर १० टक्के पगारवाढ आणि बोनसबाबत पुढील आठवड्यात पुनर्विचाराचे आश्वासन देण्यात आल्यानंतर कर्मचारी शांत झाले आणि मध्यरात्रीनंतर टोल वसुली पुन्हा सुरू झाली.