राष्ट्रीय

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्यांक दर्जा कायम; मात्र, तीन न्यायाधीशांचे नवीन खंडपीठ घेणार निर्णय

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्यांक दर्जा कायम ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ४:३ अशा बहुमताने दिला. उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठ ही अल्पसंख्यांक संस्था आहे की नाही, याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली.

Swapnil S

नवी दिल्ली : अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्यांक दर्जा कायम ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ४:३ अशा बहुमताने दिला. उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठ ही अल्पसंख्यांक संस्था आहे की नाही, याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली. मात्र, सुनावणीनंतर आता हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या नवीन खंडपीठासमोर पाठविण्यात आले असून नवीन खंडपीठ याप्रकरणी निर्णय घेणार आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, शुक्रवार हा त्यांच्या कामकाजाचा अखेरचा दिवस होता. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या खटल्याची सुनावणी चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांसह न्या. संजीव खन्ना, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांनी अल्पसंख्यांक दर्जा देण्याबाबत नवीन खंडपीठ नेमण्याला सहमती दर्शविली, तर न्या. सूर्य कांत, न्या. दीपांकर दत्त आणि न्या. एस. सी. शर्मा यांनी असहमती दर्शविली.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ केंद्रीय कायद्याद्वारे स्थापन झाले असल्यामुळे त्याला अल्पसंख्यांक संस्था म्हणता येणार नाही, असे १९६७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. अझीज बाशा विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ केंद्रीय कायद्याद्वारे स्थापन झाले असल्यामुळे ते अल्पसंख्यांक दर्जा मिळविण्यासाठी दावा करू शकत नाही. मात्र, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने आपलीच जुनी भूमिका बदलली. सरकारने नियमन आणि शासन करण्यासाठी आणलेल्या कायद्यामुळे एखाद्या संस्थेला त्यांचा अल्पसंख्यांक दर्जा गमावता येणार नाही, असा निकाल सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ४:३ अशा बहुमताने दिला.

अलाहाबाद उच्च न्यायालयात याप्रकरणी २००६ मध्ये सुनावणी झाली होती. तेव्हा अलीगढ मुस्लिम विद्यापीठ ही अल्पसंख्यांक संस्था नाही, असा निकाल देण्यात आला होता. त्याविरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली.

विद्यापीठाचा इतिहास

भारतातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक असे हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची सुरुवात १८७५ मध्ये झाली होती. ब्रिटिश काळात केम्ब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची उच्च शिक्षणासाठी स्थापना करण्यात आली होती. १८७५ मध्ये सर सय्याद यांनी मुस्लिमांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी ‘मुस्लिम अँग्लो ओरिएंटल स्कूल’ची स्थापना केली. त्यावेळी खासगी विद्यापीठांना परवानगी नव्हती. त्यामुळे आधी शाळेच्या स्वरूपात विद्यापीठ सुरू करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालय आणि १९२० मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा दर्जा दिला गेला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी