PTI
राष्ट्रीय

काश्मीर, हरयाणात निवडणूक; जम्मू-काश्मीरमध्ये १८, २५ सप्टेंबर व १ ऑक्टोबरला मतदान, हरयाणात १ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान

जवळपास एक दशकाच्या कालावधीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हरयाणा विधानसभेची निवडणूकही होणार आहे

Swapnil S

नवी दिल्ली : जवळपास एक दशकाच्या कालावधीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हरयाणा विधानसभेची निवडणूकही होणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार जम्मू-काश्मीरमध्ये १८,२५ सप्टेंबर व १ ऑक्टोबर असे तीन टप्प्यात तर हरयाणामध्ये १ ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि हरयाणात विधानसभेच्या प्रत्येकी ९० जागा आहेत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा मात्र केली नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू या अन्य दोन आयुक्तांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.जम्मू-काश्मीरमधील ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्यात आल्यानंतर तेथे प्रथमच विधानसभेची निवडणूकहोणार आहे. यापूर्वी २०१४ साली काश्मीरमध्ये पाच टप्प्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये १८ आणि २५ सप्टेंबर व १ ऑक्टोबर असे तीन टप्प्यात मतदान होणार आहे, तर हरयाणामध्ये एकाच टप्प्यात म्हणजे १ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात होणार आहे. दोन्ही राज्यांमधील निवडणुकीचे निकाल ४ ऑक्टोबर रोजी घोषित केले जाणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात २४ मतदारसंघात तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे २६ आणि ४० मतदारसंघात मतदान घेण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मीर आणि हरयाणासह महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकाही जाहीर होतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र, त्या जाहीर न झाल्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आयोगासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये हरयाणासह निवडणूक घेण्यात आली होती, मात्र जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेची गरज लक्षात घेता महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील निवडणुका कालांतराने घोषित केल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीर आणि हरयाणातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अन्य राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास अनुकूलता दर्शवून सर्वोच्च न्यायालयाने तेथे ३० सप्टेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगाने दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

पोटनिवडणुका एकाच टप्प्यात घेऊ

विधानसभेच्या ४६ आणि लोकसभेच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक शक्यतो एकाच टप्प्यात घेण्याचा आमचा विचार आहे. मात्र विविध राज्यांमधील हवामानाची स्थिती आणि वायनाडमधील भूस्खलन यामुळे या निवडणुका त्वरित घेता येऊ शकणार नाहीत, असे राजीव कुमार म्हणाले. बिहार आणि आसाममध्ये पूरस्थिती आहे, हवामानात सुधारणा होण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, सर्व पोटनिवडणुका सहा महिन्यांच्या कालावधीत घेण्यात येतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी