येत्या १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची सुरुवात होणार आहे. त्यासाठी एक दिवसापूर्वीच बीसीसीआयने टीम इंडियाच्या सुधारित आणि अंतिम संघाची घोषणा केली. परंतु संघाची घोषणा होताच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंटरनेट वापरकर्त्यांच्या निशाण्यावर आला आहे. पक्षपातीपणाचा आरोप त्याच्यावर अनेक नेटकरी करीत आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम संघात अखेरच्या क्षणी हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश करण्यात आल्याची बाब अनेक चाहत्यांना पटलेली नाही. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग असल्यामुळे भारतीय संघ निवडताना गंभीरने केकेआरच्या खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.
यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळाले नाही, याचे कारण गौतम गंभीरने संघ निवडताना पक्षपातीपणा केला आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या संघात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) च्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा त्याचसोबत श्रेयस अय्यर हा देखील एकेकाळी केकेआरचा कप्तान होता यामुळेच या तिघांची संघात निवड करण्यात आली आहे, असा चाहत्यांचा आरोप आहे.
सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. केकेआरला प्राधान्य दिल्याची टीका अनेकजण गंभीरवर करत आहेत. तर, निवडीला योग्य ठरवत निवडलेले खेळाडू पूर्णपणे पात्र असल्याचे म्हणणारेही काहीजण आहेत. एकूण नेटकऱ्यांमध्ये यावरुन विविध प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत.