पर्थ : २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारी डब्ल्यूएसीए मैदानावर भारताच्या मॅच सिम्युलेशनदरम्यान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज के. एल. राहुलच्या उजव्या कोपराला दुखापत झाली. राहुलच्या दुखापतीवर व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे.
२९ धावा केल्यानंतर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू राहुलच्या उजव्या हाताच्या कोपराला लागला. त्यानंतर संघाच्या फिजिओने तपासल्यानंतर राहुलला मैदानाबाहेर जावे लागले.
पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही तर राहुलला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळणार आहे.
राहुलच्या दुखापतीवर व्यवस्थापन लक्ष ठेवून असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर राहुल भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. बंगळुरूच्या या खेळाडूने सेंच्युरियन येथे डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचे कसोटी शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने ९ डावांत केवळ २ अर्धशतके केली आहेत. त्यामुळे हा फलंदाज सध्या धावांसाठी झगडत आहे. ऑस्ट्रेलियाविद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुलला सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र आता त्याच्या या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांच्या बॉर्डर- गावस्कर मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून कसून सराव करत आहे. उसळी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची कसोटी असेल असा अंदाज जाणकार वर्तवत आहेत. मात्र या मालिकेआधीच भारताला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. संघाचा सलामीवीर केएल राहुलच्या उजव्या कोपराला शुक्रवारी दुखापत झाली. स्टार फलंदाज विराट कोहलीने स्कॅन केल्याचे वृत्त समोर आले आहे.
मात्र त्याच्या दुखापतीबद्दल चिंता नसल्याची माहिती सूत्रांकडून समजते. गुरुवारी सरावादरम्यान युवा फलंदाज सर्फराज खान दुखापतग्रस्त झाल्याचे समजते.
सर्फराज दुखापतग्रस्त
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान गुरुवारी सराव सत्रादरम्यान नेटमध्ये फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाल्याचे समजते. एका क्रीडा वाहिनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सर्फराज नेटमधून बाहेर पडताना उजवा हात धरलेला दिसत होता. यावेळी तो काहीसा अस्वस्थ दिसत होता. मात्र, दुखापत किती गंभीर आहे हे कळले नाही.
कोहलीने केले स्कॅन?
दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला दुखापत झाली असून त्याने स्कॅन केल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने दिले आहे. मात्र कोहलीला नेमकी कुठे दुखापत झाली आहे, हे कळू शकले नाही. दरम्यान, विराट कोहलीबाबत सध्या कोणतीही चिंता नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले. कोहली मॅच सिम्युलेशनसाठी मैदानात उतरला होता. त्याने १५ धावा जमवल्या. कोहली सध्या धावांसाठी संघर्ष करत आहे. त्याने शेवटचे कसोटी शतक जुलै २०२३ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले होते. तेव्हापासून खेळलेल्या १४ कसोटी डावांत कोहलीला केवळ २ अर्धशतके जमवता आली आहेत.