मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आम्ही तिन्ही सामन्यांत सुमार खेळ केला. त्यामुळे संपूर्ण संघासह प्रशिक्षकीय चमूवर टीका होणे स्वाभाविक आहे. आम्ही या टीकेस सामोरे जात असून यातून सावरत झोकात पुनरागमन करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे स्पष्ट मत भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केले. तसेच संघातील अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत नक्कीच चमक दाखवतील, असा विश्वासही गंभीरने व्यक्त केला.
२२ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यासाठी गंभीरसह भारताचे काही खेळाडू सोमवारी सायंकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. त्यापूर्वी सोमवारी सकाळी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेसाठी गंभीर उपस्थित होता. यावेळी त्याच्यावर न्यूझीलंडविरुद्ध झालेला लाजिरवाणा मालिका पराभव तसेच आगामी आव्हानांबद्दल प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला नुकताच मायदेशातच कसोटी मालिका पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारताला ३-० अशी धूळ चारली. त्यामुळे १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावण्यासह २४ वर्षांनी व्हाइटवॉश पत्करण्याची नामुष्कीसुद्धा भारतावर ओढवली. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशांना यामुळे काहीसा धक्का बसला. आता भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका किमान ४-० अशा फरकाने जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर गंभीरने नेहमीच्या रोखठोक शैलीत भाष्य केले.
“न्यूझीलंडविरुद्धचा पराभव जिव्हारी लागणारा होता. सर्वप्रथम तर मला पराभव पत्करणेच आवडत नाही. मात्र त्यातही व्हाइटवॉशला सामोरे जावे लागल्याने आम्ही सर्वच टीकेस पात्र आहोत. परंतु यामुळे खेळाडू वाईट ठरत नाहीत. विशेषत: एखाद-दुसऱ्या खेळाडूमुळे संघ पराभूत झालेला नाही. तसेच अनुभवी खेळाडूंवर निशाणा साधणेही चुकीचे आहे,” असे ४३ वर्षीय गंभीर म्हणाला.
“जेव्हा भारताचे प्रशिक्षकपद स्वीकारले, त्यावेळीच हे किती मौल्यवान पण तितकेच काटेरी मुकुट आहे, हे मला समजले होते. त्यामुळे माझ्यावर सध्या कोणाकडूनही दडपण टाकण्यात आलेले नाही. या संघातील प्रत्येक खेळाडूवर मला विश्वास आहे. ऑस्ट्रेलियात आम्ही नक्कीच स्वत:च्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू,” असेही गंभीरने सांगितले.
रोहित-विराटच्या कामगिरीची चिंता नको!
रोहित-विराट हे मानसिकदृष्ट्या कणखर खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्या कौशल्याविषयी कोणीही शंका उपस्थित करू नये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते नक्कीच चमक दाखवतील. त्यांच्या सध्याच्या कामगिरीची मला फारशी चिंता नाही. भारतासाठी या दोघांनीही बरेसचे यश मिळवले असून यापुढेही ते देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करत राहतील, असे गंभीर म्हणाला. रोहितने गेल्या ५ कसोटींमध्ये १३३, तर विराटने तितक्याच कसोटींमध्ये १९२ धावा केल्या आहेत. फिरकीपटूंसमोर हे दोघेही अपयशी ठरले. विराटने मात्र २०२३नंतर एकही कसोटी शतक साकारलेले नाही. रोहितने इंग्लंडविरुद्ध मार्चमध्ये २ शतके झळकावली होती. त्यामुळे रोहितच्या तुलनेत सध्या विराटवर चाहते लक्ष ठेवून आहेत.
पाँटिंगने भारताविषयी विचार करू नये!
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने काही दिवसांपूर्वीच विराटने गेल्या २ वर्षांत फक्त २ कसोटी शतके झळकावल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्याविषयी एका पत्रकाराने विचारले असता गंभीरने पाँटिंगला ऑस्ट्रेलियन क्रिकेटविषयी चिंता करण्याचे सुचवले. “भारतीय क्रिकेटची पाँटिंगला इतकी चिंता का? त्याने ऑस्ट्रेलियन संघावर लक्ष द्यावे. विराट अथवा रोहितविषयी मला अथवा संघातील कुणालाही चिंता नाही,” असे गंभीरने स्पष्ट केले.
...तर बुमरा पहिल्या कसोटीसाठी कर्णधार!
रोहित शर्माची पत्नी रितिका लवकरच त्यांच्या दुसऱ्या अपत्याला जन्म देणार असल्याचे समजते. त्यामुळे रोहित पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सध्या उपकर्णधार असलेला जसप्रीत बुमरा पर्थ येथील पहिल्या सामन्यात भारताचे नेतृत्व करेल, असे गंभीरने सांगितले. बुमरा २ दिवसांनी ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे.
गंभीरला माध्यमांपासून दूर ठेवा : मांजरेकर
बीसीसीआयने यापुढे गंभीरला पत्रकार परिषदेस पाठवू नये. त्याची वर्तणूक काहीशी चुकीची तसेच धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने व्यक्त केली. “गंभीरची पत्रकार परिषद नुकतीच पाहिली. बीसीसीआयने गंभीरला यापुढे परिषदेस पाठवताना विचार करावा. कारण तो वापरत असलेले शब्द तसेच भाषाशैली, वृत्ती काहीशी अयोग्य वाटते. रोहित किंवा निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनीच पत्रकार परिषदेस यावे,” असे ट्वीट मांजरेकरने केले. मात्र गंभीरच्या नेमक्या कोणत्या उत्तराविषयी त्याने हे ट्वीट केले, हे अद्याप समजलेले नाही.
विराटसह पहिली फळी पर्थला दाखल
विराट कोहली, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासह भारताचे अन्य काही खेळाडू रविवारी रात्री पर्थमध्ये दाखल झाले. मंगळवारपासून भारतीय संघाचे सराव शिबीर सुरू होणार असून पुढील १० दिवसांत ते भारत-अ संघाविरुद्ध सराव सामनाही खेळणार आहेत. रविवारी दाखल झालेल्या तुकडीत सर्फराझ खान, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांचाही समावेश होता. सोमवारी प्रशिक्षक गंभीरसह यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, हर्षित पर्थसाठी रवाना झाले.
स्थित्यंतराविषयी अद्याप फारसा विचार नाही!
भारतीय कसोटी संघातील चार प्रमुख खेळाडू हे सध्या पस्तिशीपुढे आहेत. विराट (३६ वर्षे), रोहित (३७), रविचंद्रन अश्विन (३८) व रवींद्र जडेजा (३५) या चौघांच्या कारकीर्दीतील हा अखेरचा ऑस्ट्रेलियन दौरा ठरू शकतो. त्याविषयी विचारले असता गंभीर म्हणाला की, “मी स्थित्यंतराविषयी फारसा विचार करत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये जिंकण्याची भूक आहे. त्यामुळे स्थित्यंतर जेव्हा व्हायचे असेल, तेव्हा आपोआप होईल.”
नितीश, हर्षित यांना संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा!
नितीश रेड्डी व हर्षित राणा यांच्यातील कौशल्याचा आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लाभ उचलायचा आहे. हर्षित नुकताच रणजी सामना खेळून आला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया-अ संघाच्या दौऱ्यावर पाठवण्यात आले नाही, तर नितीशची फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी तेथील खेळपट्ट्यांवर फायदेशीर ठरू शकेल. संघ व्यवस्थापनाचा या खेळाडूंना पूर्ण पाठिंबा आहे, असे गंभीरने उत्तर दिले.
रोहित नसल्यास राहुल सलामीला!
सध्या तरी आम्हाला रोहित पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल की नाही, याविषयी १० टक्के माहिती मिळालेली नाही. मात्र तो नसल्यास अभिमन्यू ईश्वरन किंवा के. एल. राहुल यांच्यापैकी एकाला सलामीला संधी देण्यात येईल, असे गंभीरने म्हटले. त्यातच गंभीरने या शर्यतीत राहुल अग्रेसर असल्याचेही सांगितले. “राहुलकडे सलामीपासून ते सहाव्या क्रमांकापर्यंत कोणत्याही स्थानी फलंदाजी करण्याची क्षमता आहे. असे फलंदाज फार कमी संघात असतात. त्यामुळे राहुल संधी मिळाल्यास छाप पाडेल,” असा इशारा गंभीरने दिला. राहुल व ईश्वरन दोघेही नुकताच भारत-अ संघाकडून ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध कसोटी सामना खेळले. मात्र दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही.
कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी सोडा, सध्या फक्त ऑस्ट्रेलियावर लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच त्यांचा अंतिम फेरीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. मात्र गंभीरला याविषयी चिंता नाही. “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरी अद्याप फार दूर आहे. आमचे लक्ष्य फक्त ऑस्ट्रेलिया मालिकेवर असून प्रत्येक कसोटीत स्वत:चे सर्वोत्तम योगदान दिले, तर पुढील गणित आपसुकच सोपे होईल. त्यामुळे आतापासूनच डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीविषयी बोलू नका,” असे गंभीरने स्पष्टपणे सांगितले व चाहत्यांनाही पाठिंबा देण्याचे आवाहन केले.