Mumbai : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक समोर; पारंपरिक रूपाने जिंकली भाविकांची मनं

Mayuri Gawade

चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, भव्य आगमन सोहळ्याआधी यंदाच्या बाप्पाची पहिली झलक समोर आली आहे.
यंदाही चिंतामणी बाप्पाचं पारंपरिक आणि भाविकांच्या परिचयाचं रूप कायम ठेवण्यात आलं असून, पहिली झलक पाहून मुंबईकरांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
प्रसन्न चेहरा, सुबक रूप आणि ओळखीची ठेवण यामुळे चिंतामणी बाप्पाच्या यंदाच्या रूपाला भाविकांकडून ‘जुन्या रूपाचीच मोहिनी’ अशी प्रतिक्रिया मिळत आहे.
चिंतामणी बाप्पाचं रूप पारंपरिक असलं तरी यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाने तिरुपती बालाजीवर आधारित खास आध्यात्मिक थीम निवडली आहे.
आज, २९ ऑगस्ट रोजी दुपारी परळ येथील मध्य रेल्वे वर्कशॉप मैदानातून चिंतामणी बाप्पाच्या भव्य आगमन सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
ढोल-ताशांचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत चिंतामणी बाप्पाची आगमन मिरवणूक लालबाग-परळ परिसरातून मार्गक्रमण करणार आहे.
बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून, लालबाग-परळ परिसरात मुंबई पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
पारंपरिक रूपाची मोहिनी आणि तिरुपती बालाजीची खास सजावट यामुळे यंदाच्या चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पाच्या आगमनाकडे मुंबईकरांचं विशेष लक्ष लागलं आहे. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम | सोशल मीडिया