झोपण्यापूर्वी तळव्यांना करा 'या' पद्धतीने मसाज; दिवसभराचा थकवा घालवण्याची सोपी ट्रिक

Mayuri Gawade

दिवसभर घरातील कामे, ऑफिसची धावपळ आणि प्रवास यामुळे शरीरासोबतच पायही थकतात. रात्री झोपताना तळव्यांमध्ये जडपणा किंवा वेदना जाणवत असतील, तर पायांना थोडा आराम देणे गरजेचे आहे.
झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तेलाने हलका मसाज करणे हा पारंपरिक उपाय आहे. आयुर्वेदात या पद्धतीला ‘पादाभ्यंग’ असे म्हणतात.
तळव्यांना मसाज करण्यासाठी खोबरेल तेल, तीळ तेल किंवा बदाम तेलाचा वापर करू शकता. त्वचेला सूट होणारे तेल निवडणे महत्त्वाचे आहे.
मसाज करण्यापूर्वी सर्वप्रथम पाय स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. शक्य असल्यास कोमट पाण्याने पाय धुतल्यामुळे दिवसभराचा थकवा कमी झाल्यासारखे वाटू शकते.
पाय स्वच्छ धुतल्यानंतर टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्या. त्यानंतर हातावर थोडे तेल घेऊन दोन्ही तळव्यांना लावा.
अंगठ्याच्या साहाय्याने टाचेपासून पायाच्या बोटांपर्यंत गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने मसाज करा. यावेळी खूप जोर लावणे टाळा.
तळव्यांचा मधला भाग, टाच आणि पायाच्या कमानीच्या भागावरही हलक्या हाताने मसाज करा. बोटांच्या आसपासच्या भागालाही तेल लावून मालीश करा.
प्रत्येक पायाला साधारण ५ ते १० मिनिटे मसाज करण्यासाठी वेळ द्या. मसाज झाल्यानंतर अतिरिक्त तेल पुसून घ्या आणि पाय घसरणार नाहीत याची काळजी घ्या.
तळव्यांना हलका मसाज केल्यामुळे पायांचा थकवा आणि स्नायूंमधील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. झोपण्यापूर्वी हा आरामदायी दिनक्रम केल्याने मन शांत होऊन झोपेसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते. | All Photos : AI Generated