राणादा अन् पाठकबाईंचा रोमँटिक अंदाज; फोटो शेअर करत हार्दिक जोशी म्हणाला...
Sagar Sirsat
मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं म्हणून अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरला ओळखले जाते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले. या मालिकेत त्याने रणविजय गायकवाड म्हणजे राणादा हे पात्र साकारले होते. तर या मालिकेत अक्षया देवधरने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती.
दोघेही राणादा-पाठकबाई याच नावाने लोकप्रिय झाले. हार्दिक आणि अक्षया 2 डिसेंबर 2022 ला सप्तपदी घेत विवाहबंधनात अडकले. आता हार्दिकने अक्षयासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
हार्दिक जोशी हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच हार्दिकने इन्स्टाग्रामवर व्हॅलेंटाईन डे निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने अक्षयासोबतचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी अक्षयाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. तर हार्दिकने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि त्याच रंगाची पँट परिधान केली आहे. यात ते दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत.
हार्दिकने या रोमँटिक फोटोला हटके कॅप्शनही दिले आहे. "दिवसेंदिवस आपल्यातील प्रेम हे अजूनच मजबूत होत आहे. माझ्या सुंदर पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा", असे हार्दिकने म्हटले आहे. हार्दिकची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
हार्दिकच्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी हार्दिकच्या पोस्टवर राणादा आणि पाठकबाईंना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा असे म्हटले आहे. तर काहींनी यावर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.