दिवाळीत चकली, चिवडा, लाडू खा; पण आरोग्याचीही काळजी घ्या; फराळाचा आस्वाद घेताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी
Mayuri Gawade
दिवाळी म्हणजे फराळाची रेलचेल, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि मित्रमैत्रिणींसोबत धमाल! मात्र, या धावपळीत खाण्यापिण्याच्या वेळा, झोप आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे सणाचा आनंद घेताना काही छोट्या सवयी जपणे गरजेचे आहे.
दिवाळीत सकाळी उशिरा उठलात तरी दिवसाची सुरुवात थोड्या चालण्याने करा. घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा घराजवळ १० ते १५ मिनिटे फेरफटका मारा. यामुळे शरीराची हालचाल होण्यास मदत होईल.
चकली, चिवडा, लाडू आणि करंजी असे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका. फराळ किंवा जेवण झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे घरात हळूहळू चाला. विशेषतः अॅसिडिटीचा त्रास असल्यास ही काळजी घ्या.
फराळाच्या गडबडीत अनेकदा पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पुरेसे पाणी प्या. खारट पदार्थ खाल्ल्यानंतरही शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
दिवाळीच्या साफसफाईपासून खरेदीपर्यंत अनेक कामांमुळे शरीरावर ताण येतो. अशावेळी दिवसातून ५ ते १० मिनिटे मान, खांदे, हात, पाय आणि पाठीचे हलके स्ट्रेचिंग करा.
दिवाळीत केवळ फराळ खाऊन पोट भरू नका. चकली, चिवडा आणि लाडू यांसोबत डाळ, भाजी, पोळी, कोशिंबीर आणि फळांचाही आहारात समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.
दिवाळीच्या सुट्टीत दिवसभर एकाच जागी बसून राहू नका. मित्रमैत्रिणींसोबत बॅडमिंटन, कॅरम किंवा इतर आवडते खेळ खेळा. लहान मुलांसोबत खेळल्यानेही शरीराची हालचाल होईल आणि वेळ आनंदात जाईल.
दिवाळीच्या रात्री गप्पा, चित्रपट किंवा खेळांमुळे झोपायला उशीर होऊ शकतो. मात्र, रोजच झोपेच्या वेळा बिघडू देऊ नका. शक्य असल्यास दुसऱ्या दिवशी पुरेशी विश्रांती घ्या आणि झोपेचे नियमित वेळापत्रक सांभाळा.
दिवाळीचा आनंद घेताना आहार, पाणी, शारीरिक हालचाल आणि झोप या चार गोष्टींकडे लक्ष द्या. रोजच्या दिनक्रमात केलेले छोटे बदल सणाच्या धावपळीतही उत्साही आणि ताजेतवाने राहण्यास मदत करू शकतात. | All Photos : AI Generated