केस गळतात, वाढही खुंटलीय? जास्वंदीच्या फुलांपासून घरीच बनवा 'हा' टोनर

Mayuri Gawade

केस गळणे, रुक्ष होणे आणि तुटणे अशा समस्या जाणवत असतील, तर केसांची नियमित निगा राखणे महत्त्वाचे आहे. यासाठी जास्वंदीच्या फुलांचा घरगुती टोनर वापरून पाहू शकता.
जास्वंदीच्या फुलांचा वापर केसांच्या निगेसाठी केला जातो. त्यापासून तयार केलेले पाणी केस मऊ आणि चमकदार दिसण्यासाठी मदत करू शकते.
जास्वंदीच्या फुलांचा टोनर बनवण्यासाठी दोन मोठे चमचे सुकवलेली जास्वंदीची फुले किंवा त्यांची पावडर आणि अर्धा कप पाणी घ्या.
सर्वप्रथम जास्वंदीची ताजी फुले स्वच्छ धुऊन घ्या आणि ती पूर्णपणे वाळवून घ्या. सुकलेल्या फुलांची बारीक पावडर करूनही टोनर तयार करता येतो.
एका भांड्यात अर्धा कप पाणी गरम करून त्यात दोन चमचे सुकलेली जास्वंदीची फुले किंवा पावडर घाला. हे मिश्रण मंद आचेवर पाच ते सात मिनिटे उकळू द्या.
मिश्रण उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर स्वच्छ गाळणी किंवा सुती कपड्याच्या मदतीने पाणी गाळून घ्या.
तयार झालेले जास्वंदीचे पाणी स्वच्छ स्प्रे बाटलीत भरा आणि टाळूवर थोड्या प्रमाणात लावा. वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर त्याची चाचणी करा.
टोनर टाळूवर लावल्यानंतर बोटांच्या मदतीने हलक्या हाताने दोन ते तीन मिनिटे मालिश करा. जोरात घासणे टाळा, त्यामुळे केस ओढले जाणार नाहीत.
जास्वंदीचा टोनर वापरण्यापूर्वी तो त्वचेला मानवतो का, हे तपासा. या उपायामुळे केसांची वाढ दुप्पट होईल याचा ठोस पुरावा नाही, त्यामुळे केसांच्या वाढीसाठी संतुलित आहार आणि योग्य निगाही महत्त्वाची आहे. | All Photos : AI Generated