हॉटेल किंवा ट्रायल रूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? मोबाईलच्या मदतीने असं ओळखा

Mayuri Gawade

प्रवासात हॉटेलमध्ये राहणे किंवा शॉपिंग करताना ट्रायल रूम वापरणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, अशा ठिकाणी आपली प्रायव्हसी सुरक्षित आहे ना, याची खात्री करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
हॉटेल रूम, चेंजिंग रूम किंवा भाड्याच्या घरात कधी कधी छोट्याशा वस्तूमध्ये छुपा कॅमेरा लपवलेला असू शकतो. अशा कॅमेऱ्यांचा शोध घेण्यासाठी तुमचा स्मार्टफोन काही प्रमाणात उपयोगी ठरू शकतो.
काही छुपे कॅमेरे अंधारात चित्रीकरण करण्यासाठी इन्फ्रारेड प्रकाश वापरतात. हा प्रकाश डोळ्यांना दिसत नसला, तरी काही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांमध्ये तो दिसू शकतो.
इन्फ्रारेड प्रकाश तपासण्यासाठी खोलीतील दिवे बंद करा आणि फोनचा कॅमेरा सुरू करा. त्यानंतर घड्याळ, स्मोक डिटेक्टर, एसी व्हेंट आणि इतर संशयास्पद वस्तूंकडे कॅमेरा फिरवा.
तुमचा फोन इन्फ्रारेड प्रकाश ओळखतो का, हे तपासण्यासाठी टीव्हीचा रिमोट वापरा. रिमोटचे बटण दाबून त्याच्या पुढील भागाकडे फोनचा कॅमेरा वळवा. स्क्रीनवर प्रकाश चमकताना दिसल्यास फोन तो प्रकाश टिपू शकतो.
छुपा कॅमेरा शोधण्यासाठी फोनचा फ्लॅशलाइटही वापरू शकता. अंधाऱ्या खोलीत फ्लॅशलाइट सुरू करून फोटो फ्रेम, प्लग पॉइंट आणि इतर संशयास्पद वस्तूंवर हळूहळू प्रकाश टाका.
एखाद्या वस्तूमध्ये कॅमेऱ्याची लेन्स असल्यास फ्लॅशलाइटच्या प्रकाशामुळे छोटासा चमकणारा ठिपका दिसू शकतो. मात्र, प्रत्येक चमकणारा ठिपका म्हणजे छुपा कॅमेरा असेलच असे नाही.
स्मार्टफोनच्या कॅमेरा किंवा फ्लॅशलाइटच्या मदतीने सर्वच छुपे कॅमेरे शोधता येतात असे नाही. काही कॅमेरे इन्फ्रारेड प्रकाश वापरत नाहीत, तर काहींची लेन्स अतिशय खोलवर लपवलेली असते.
एखादा संशयास्पद कॅमेरा आढळल्यास त्याला हात लावू नका. सुरक्षित अंतरावरून फोटो किंवा व्हिडिओ काढा आणि तात्काळ त्या जागेतून बाहेर पडा. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापन आणि पोलिसांना माहिती द्या. आपली प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. | All Photos : AI Generated