महिनाभर फराळ राहील कुरकुरीत अन् खमंग! चकली, चिवडा साठवताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी
Mayuri Gawade
दिवाळीचा फराळ म्हणजे चकली, चिवडा, लाडू आणि शंकरपाळीचा खमंग आस्वाद! मात्र, मेहनतीने बनवलेला फराळ काही दिवसांतच मऊ पडू नये किंवा त्याचा स्वाद बदलू नये, यासाठी साठवताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
फराळाचे पदार्थ तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर लगेच डब्यात भरू नका. ते पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्यात ठेवा, अन्यथा वाफेमुळे ओलावा निर्माण होऊन पदार्थ मऊ पडू शकतात.
चिवडा साठवण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि हवाबंद डबा वापरा. त्यामुळे बाहेरील हवा आणि ओलावा आत जाणार नाही, तसेच चिवड्याचा कुरकुरीतपणा टिकण्यास मदत होईल.
चकली आणि शेव पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यात भरून ठेवा. डबा व्यवस्थित बंद केल्यास या पदार्थांचा कुरकुरीतपणा अधिक काळ टिकण्यास मदत होते.
लाडू साठवताना डबा पूर्णपणे कोरडा असणे महत्त्वाचे आहे. ओलसर डब्यात लाडू ठेवल्यास त्यांचा दर्जा आणि चव खराब होऊ शकते.
शंकरपाळी तळल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे त्यांचा कडकपणा आणि खुसखुशीतपणा टिकवता येतो.
फराळाचे पदार्थ काढताना ओले हात किंवा ओला चमचा वापरू नका. हातातील किंवा चमच्यावरील ओलावा डब्यात गेल्यास फराळ लवकर खराब होण्याची शक्यता असते.
सर्व प्रकारचा फराळ एकाच डब्यात ठेवण्याऐवजी प्रत्येक पदार्थासाठी स्वतंत्र डबा वापरा. तसेच हे डबे गॅस, पाण्याची वाफ आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
फराळाचा डबा उघडताना एकाच वेळी सगळा फराळ बाहेर काढू नका. खाण्यासाठी लागेल तेवढाच फराळ काढा आणि उरलेला भाग लगेच झाकून ठेवा.
| All Photos : AI Generaated