Ginger Storage Tips : आलं लवकर खराब होतंय? जास्त काळ ताजं ठेवण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
किशोरी घायवट-उबाळे
चहा, भाजी किंवा चटणी अशा अनेक पदार्थांमध्ये आलं वापरलं जातं. मात्र, योग्य साठवण न केल्यास आलं लवकर मऊ पडतं, सुरकुततं किंवा त्याला बुरशी लागू शकते.
आलं जास्त काळ ताजं ठेवण्यासाठी ते साठवण्याची योग्य पद्धत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी काही सोप्या टिप्स उपयोगी ठरू शकतात.
पुढील काही आठवड्यांत आलं वापरणार असाल, तर ते न सोलता पेपर टॉवेलमध्ये हलकेच गुंडाळा. त्यानंतर एअरटाइट डब्यात किंवा झिप लॉक बॅगमध्ये ठेवून फ्रिजच्या क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवा.
फ्रीजरमध्ये ठेवलेलं आलं वापरण्यापूर्वी वितळवण्याची गरज नाही. गरजेनुसार थेट किसून घ्या आणि उरलेलं आलं पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवा.
आलं जास्त काळ टिकवण्यासाठी ते फ्रीजरमध्ये ठेवणं हा एक चांगला पर्याय आहे. संपूर्ण न सोललेलं आलं फ्रीजर बॅगमध्ये ठेवून त्यातील अतिरिक्त हवा काढून टाका.
सोललेलं आलं साध्या पाण्यात बुडवून ठेवणं टाळा. या पद्धतीमुळे आलं लवकर मऊ आणि तंतुमय होऊ शकतं. खोलीच्या तापमानावर ठेवायचं असल्यास अख्खं आलं कोरड्या जागी आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
रोजच्या स्वयंपाकात आलं वापरत असाल, तर ते एकदाच जास्त प्रमाणात किसून घ्या. किसलेलं आलं आईस क्यूब ट्रेमध्ये भरून फ्रीज करा आणि नंतर हे क्यूब्स फ्रीजर बॅगमध्ये साठवा.
आलं वापरण्यापूर्वी त्याची स्थिती तपासा. बुरशी, विचित्र वास किंवा जास्त मऊपणा जाणवल्यास ते वापरू नका. योग्य साठवण केल्यास अन्नाची नासाडी कमी करण्यास मदत होऊ शकते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)