Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील 'या' शिव मंदिरांना नक्की भेट द्या, पाहा Photo's

किशोरी घायवट-उबाळे

यंदा १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री असून या पवित्र दिवशी मुंबईतील अनेक प्राचीन आणि जागृत शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी होते.
महाशिवरात्रीला शिवभक्त उपवास, जप आणि रात्रभर जागरण करून भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करतात.
या दिवशी भेट देता येतील अशी मुंबईतील प्रमुख शिवमंदिरे जाणून घेऊया.
वाळकेश्वर महादेव मंदिर: मलबार हिल परिसरातील हे ऐतिहासिक मंदिर बाणगंगा तलावाजवळ आहे. महाशिवरात्रीला येथे विशेष पूजाअर्चा आणि धार्मिक कार्यक्रम होतात. बाणगंगेच्या काठावर वसलेले हे प्राचीन मंदिर अत्यंत शांत आणि ऐतिहासिक स्थळ आहे
कोपिनेश्वर मंदिर : ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर. महाशिवरात्रीला येथे रात्रभर दर्शनाची सुविधा आणि मोठा उत्सव साजरा केला जातो.
बाबुलनाथ मंदिर: दक्षिण मुंबईतील हे अत्यंत प्रसिद्ध आणि प्राचीन शिव मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे पहाटेपासून दर्शनासाठी मोठी रांग लागते. मंदिर टेकडीवरअसल्यामुळे येथून सुंदर शहर दृश्यही दिसते. गिरगाव चौपाटीजवळ टेकडीवर वसलेले हे लोकप्रिय मंदिर आहे, जिथे महादेवाची पिंड स्वयंभू मानली जाते.
अंबरनाथचे शिव मंदिर : हे ११ व्या शतकातील मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. हे ऐतिहासिक आणि प्राचीन दगडी मंदिर असून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शिव मंदिरांमध्ये गणले जाते. धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व आहे.
तुंगारेश्वर शिव मंदिर : वसई पूर्व परिसरातील हे एक प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानले जाणारे शिव मंदिर आहे. हे मंदिर वसई परिसरातील सर्वात उंच पर्वत पठारांपैकी एकावर वसलेले असून ते समुद्रसपाटीपासून सुमारे २१७७ फूट उंचीवर आहे. निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेले असल्यामुळे येथे भक्तांसोबतच ट्रेकर्सही मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
महाशिवरात्री हा भगवान शिवच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून या दिवशी मंदिर दर्शनाला विशेष धार्मिक महत्त्व असते. त्यामुळे मुंबईतील ही मंदिरे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतील.