महिनाभराचा किराणा आणताना पैशांची बचत कशी कराल? गृहिणींसाठी खास टिप्स!
Mayuri Gawade
महागाईच्या काळात महिन्याचा घरखर्च सांभाळताना किराणा सामानावरही मोठा खर्च होतो. मात्र, खरेदीचं योग्य नियोजन केल्यास कमी पैशांत महिनाभराचा किराणा आणणं शक्य आहे.
किराणा खरेदीला जाण्यापूर्वी घरात कोणत्या वस्तू संपल्या आहेत आणि कशाची गरज आहे, याची यादी तयार करा. यादीप्रमाणेच खरेदी केल्यास अनावश्यक वस्तूंवर होणारा खर्च टाळता येतो.
डाळी, तांदूळ, मसाले आणि इतर जास्त दिवस टिकणाऱ्या वस्तू घाऊक बाजारातून खरेदी करण्याचा पर्याय निवडा. मात्र, वस्तूंची गुणवत्ता आणि वापराचं प्रमाण लक्षात घेऊनच मोठ्या प्रमाणात सामान आणा.
किराणा खरेदी करताना दुकानातील ऑफर्स आणि डिस्काउंट तपासा. मात्र, केवळ सवलत मिळतेय म्हणून गरज नसलेल्या वस्तू खरेदी करू नका. आवश्यक वस्तूंवर मिळणाऱ्या सवलतींचाच फायदा घ्या.
प्रत्येक वस्तू महागड्या ब्रँडचीच असावी असं नाही. चांगल्या दर्जाचे स्थानिक ब्रँड किंवा विश्वासार्ह पर्याय निवडल्यास किराणा बजेटमध्ये बचत होऊ शकते. खरेदीपूर्वी गुणवत्ता आणि किंमत दोन्ही तपासा.
भाज्या, फळं आणि लवकर खराब होणाऱ्या वस्तू गरजेपुरत्याच खरेदी करा. जास्त प्रमाणात सामान आणल्यामुळे ते खराब होऊन वाया जाऊ शकतं आणि पैशांचंही नुकसान होतं.
काही पदार्थ आणि मसाले घरी तयार करता येत असतील, तर ते बाहेरून विकत घेण्याऐवजी घरच्या घरी बनवण्याचा पर्याय निवडा. यामुळे तयार पदार्थांवर होणारा अतिरिक्त खर्च कमी करता येतो.
किराणा खरेदीपूर्वी वेगवेगळ्या दुकानांमधील किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील किंमतींची तुलना करा. तसेच खरेदीसाठी ठरवलेलं बजेट सोबत ठेवा आणि त्यानुसारच खर्च करण्याचा प्रयत्न करा.
घरात आधीपासून असलेलं किराणा सामान वापरल्यानंतरच नवीन खरेदी करा. डाळी, तांदूळ, पीठ आणि साखर हवाबंद डब्यांमध्ये साठवा. योग्य साठवणुकीमुळे सामान लवकर खराब होण्यापासून वाचण्यास मदत होते.
| All Photos : AI Generated