मुंबई 'लोकल'ला १०० वर्ष पूर्ण... बघा मुंबईकरांची Lifeline पहिल्यांदा कधी आणि कोणत्या मार्गावर धावली

Swapnil S

मुंबईकरांचे जीवन लोकलच्या वेगावर धावत असते. ८.४२ ची... ९.३५ ची...११.१८ ची...१२.१२ ची आदी लोकलच्या टाइमवर मुंबईकर आपले स्वत:चे वेळापत्रक आखतो. मुंबईकरांच्या जीवनाला आपल्या वेळापत्रकात बांधणारी मुंबईची लाडकी लोकल सोमवारी १०० वर्षं पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. | छायाचित्र सौ : @mumbaiheritage
३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबईत पहिल्यांदा उपनगरीय लोकल धावली. त्यानंतर सलग १०० वर्षांच्या प्रवासात तिने कोट्यवधी प्रवाशांची ने-आण करत त्यांची रोजीरोटी सुरू ठेवली. | छायाचित्र सौ : @mumbaiheritage
भारतात पहिल्यांदा ३ फेब्रुवारी १९२५ रोजी विजेवरील रेल्वे गाडी धावली. त्यावेळी या लोकलला ४ डबे होते. त्यावेळेच्या व्हिक्टोरिया टर्मिनस (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सीएसएमटी) ते कुर्लादरम्यान ही लोकल धावली होती. | छायाचित्र सौ : @mumbaiheritage
३ फेब्रुवारी १९२५ रोजी या लोकल सेवेच्या उद्घाटनाच्या वेळी सर लेस्ली विल्सन हे लेडी विल्सनसह आले होते. फलाट क्रमांक दोनवरून त्यांनी सकाळी १० वाजता या लोकल सेवेला हिरवा कंदील दाखवला. या लोकलचे सारथ्य करण्याचा मान जहाँगीर फ्रामजी दारुवाला यांना मिळाला होता. भारतातील पहिला मोटरमन बनण्याचा मान याच दारुवाला यांना मिळाला आहे. | छायाचित्र सौ : @mumbaiheritage
या विजेच्या रेल्वेमुळे भारतातील तसेच आशियातील वाहतूक सेवेत मोठे बदल झाले. त्यामुळे भारतीय रेल्वेत क्रांती घडली. विजेवर रेल्वे धावल्याने रेल्वेची कार्यक्षमता वाढून प्रवासाचा कालावधी कमी झाला. | छायाचित्र सौ : @mumbaiheritage
रेल्वेचे विद्युतीकरण झाल्याने भारतीय रेल्वे प्रवासात मोठे बदल झाले. यामुळे सातत्याने रेल्वे इंजिन बदलाची गरज संपली. तसेच प्रवासातील विलंब कमी झाला. रेल्वेच्या परिचलन खर्चातही बचत झाली. त्यामुळे कोळशाच्या इंजिनावरील रेल्वेचे अवलंबित्व संपले. | छायाचित्र सौ : @mumbaiheritage
भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला १०० वर्षं होत आहे. त्याची सुरुवात १९२५ च्या विजेच्या लोकलमधून झाली. रेल्वे बोर्डाचे अतिरिक्त सदस्य (आरई) डॉ. जयदीप गुप्ता म्हणाले की, भारतात १८५३ ला रेल्वे सुरू झाली. | छायाचित्र सौ : @mumbaiheritage
३ फेब्रुवारी १९२५ रोजी भारतीय रेल्वेने विजेवर लोकल सेवा चालवून आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात खोवला. १९२५ ते २०२५ या काळात भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे. विजेचे इंजिन हे वाफेच्या इंजिनापेक्षा अधिक क्षमतेचे होते. | FPJ
त्याकाळी विजेवर चालणाऱ्या पायाभूत सुविधांचा खर्च खूप होता. पण, सध्या लोकल सेवेतून प्रवाशांची होणारी वाहतूक पाहता तो काळाच्या कसोटीवर उतरला आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरातील वाहतुकीचा मोठा भार या उपनगरीय लोकलवर आहे. | PTI