Summer Drink : उन्हाळ्यात 'या' पेयांनी मिळेल शरीराला गारवा

Kkhushi Niramish

उन्हाळ्यातील सर्वोत्तम पेय म्हणजे शहाळ्याचं पाणी किंवा नारळ पाणी, उन्हामुळे शरीर डिहायड्रेट झाले असेल आणि त्यामुळे चक्कर येत असेल तर नारळ पाणी पिल्याने लगेच आराम मिळतो.
ताक - तसे पाहिले तर ताक हे तुम्ही वर्षाचे १२ महिने पिऊ शकता. ताकाचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात तर ताकाचे पंचकर्म देखील सुचवले आहे. मात्र, उन्हाळ्यात अनेकवेळा तिखट मसालेदार जेवण पचत नाही. अशा वेळी ताक पिल्याने पोटातील दाहकता कमी होते.
कोकम सरबत - कोकम अर्थात आमसूल हे पित्तनाशक असून शरीरासाठी गार असते. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सरबत पिल्याने आराम मिळतो. बाजारात कोकम आगळ मिळते. ते आणून ठेवल्यास त्यापासून सरबत तयार करता येते.
लिंबू सरबत हे कोणत्याही ऋतूत पिले तरी त्याचे नुकसान काहीच होत नाही. मात्र, उन्हाळ्यात विशेष करून काही तरी झटपट गार प्यावे वाटते. अशा वेळी लिंबू सरबत हा उत्तम पर्याय असतो. लिंबू, मीठ आणि साखर यांच्या योग्य मिश्रणाने लिंबू पाणी तयार करता येते. तुम्हाला उन्हामुळे गरगरल्यासारखे होत असेल तर लिंबू सरबत प्या त्याने आराम मिळतो.
आवळा सरबत - आवळा हा बहुगुणी असून अनेक आजारांवर त्याचा उपयोग होतो. बाजारात आवळ्याचे सिरप मिळते हे सिरप पाण्यात मिसळून जोडीला साखर, काळे मीठ टाकून आवळा सरबत बनवता येते.
उसाचा रस - कष्टकरी माणसांसाठी उसाचा रस हा सर्वोत्तम असतो. याने शरीरात तातडीने ऊर्जा उत्पन्न होते. उन्हातानात काम करणाऱ्यांसाठी उसाचा रस सर्वोत्तम असतो.
लस्सी - उन्हाळ्यातील चवीष्ट पेय म्हणून लस्सीकडे पाहिले जाते. दह्यात पाणी मिसळून लस्सी बनवली जाते. मात्र, ताक आणि लस्सीत फरक असतो. लस्सी ही जाडसर असते. दोघांच्या गुणधर्मात देखील फरक असतो.
कलिंगड किंवा टरबूजचे ज्यूस - उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट झाल्यास कलिंगड किंवा टरबूजचे ज्यूस शरीराला लगेच हायड्रेट करते. कलिंगडाचे ज्यूस पिण्याचे अन्यही अनेक फायदे आहेत.