टाटांची मार्केटिंग कमाल! दिवाळी आणि मोती साबण यांचं नातं कसं जोडलं गेलं?

Mayuri Gawade

“उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली!” या एका जाहिरातीने मोती साबणाला घराघरात प्रसिद्धी मिळवून दिली.
पण, या मोती साबणाचा आणि दिवाळीचा संबंध आला कसा? या मागे आहे रंजक कथा.
सत्तरच्या दशकात टोमॅको म्हणजेच टाटा ऑइल मिल्सने हा साबण ‘भारताचा सर्वात महागडा साबण’ म्हणून लॉन्च केला होता.
पण, त्यावेळी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चौकोनी आकारात येणाऱ्या साबणाची परंपरा मोडून टाटा कंपनीने गोल आणि टपोऱ्या मोतीचा आकार देऊन 'मोती' साबण तयार केला.
नंतर टोमॅको हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि मोती साबणाला ब्रॅंड म्हणून नावलौकिक मिळालं.
त्याचं कारण म्हणजे कंपनीतल्या एका व्यक्तीने हा साबण दिवाळीच्या अभ्यंगस्नानाशी जोडला आणि ‘राजेशाही स्नान’ ही कल्पना उतरवली.
मात्र, या साबणाला खरी ओळख मिळाली २०१३ मध्ये आलेल्या ‘अलार्म काका’ यांच्या जाहिरातीमुळे.
त्या जाहिरातीत चाळ संस्कृती, कुटुंबाचा आनंद आणि पहाटेचं अभ्यंगस्नान यांची भावनिक जोड दाखवली गेली.
त्यामुळे एकेकाळी महागडा वाटणारा मोती साबण सामान्य वर्गातील लोकांच्याही घरात दिवाळीला आवर्जून दिसू लागला.
आजही दिवाळीत या साबणाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. ज्यामुळे कंपनीला कोट्यवधींचा नफा मिळतो.
प्रत्येक घरात मोती साबण म्हणजे दिवाळीचा अविभाज्य भाग मानला जातो.