Rose Day निमित्ताने आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचे गुलाब द्याल? जाणून घ्या गुलाबांच्या रंगाचे अर्थ

Swapnil S

लाल गुलाब- आपल्याकडे लाल गुलाबाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते . आपल्या मनातील प्रेम व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर केला जातो. प्रेमी युगुलांच्या जीवनात लाल गुलाबाला मोठं महत्व असतं. त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर केला जातो.
पांढरे गुलाब- निस्वार्थी प्रेमाचं प्रतिक पांढरा रंग हा तसा शांततेचं प्रतिक समजले जाते. त्यामधून पवित्रता आणि शांतीची भावना व्यक्त होते. जर तुम्ही कोणावर शुद्ध आणि निस्वार्थी प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला पांढरे गुलाब देऊ शकता. आपल्या नात्यातील प्रेम दर्शवण्यासाठी या गुलाबांचा वापर केला जातो. कोणत्याही नात्याची सुरुवात करताना या रंगाचे गुलाब देण्यात येतात. महत्त्वाचं म्हणजे नात्याची शेवट करतानाही याच रंगाचे गुलाब देण्यात येतात.
गुलाबी गुलाब- गुलाबी रंग हा प्रोत्साहनाचा, प्रेरणेचा रंग मानला जातो. तसेच आपल्याला कोणी आवडत असेल तर त्याची कबुली या गुलाबी गुलाबातून देता येते. आपण कोणाकडून प्रेरित झाला असाल किंवा कोणाला आपला आदर्श मानत असाल तर त्याच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता.
पिवळे गुलाब - मैत्रीचे प्रतिक म्हणजे पिवळा रंग मानला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणी ना कोणी खास मित्र असतात, ज्यांच्यासाठी आपण काहीही करु शकतो. जर तुमच्यातील मित्रत्वाचे संबंध समुद्राप्रमाणे अथांग असतील तर अशा व्यक्तीला तुम्ही पिवळे गुलाब देऊ शकता आणि आपल्या मैत्रिची भावना व्यक्त करु शकता.
केशरी गुलाब - केशरी रंग हा त्यागाचे आणि वीरतेचे प्रतिक मानला जातो. जर तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल किंवा त्याच्या प्रती समर्पणाची भावना असेल तर त्या व्यक्तीला केशरी रंगाचे गुलाब देऊ शकता. या रंगाचे गुलाब दुर्मीळ आहे. तसंही या रंगाप्रमाणे खरे प्रेमही दुर्मीळ असल्याचं दिसतंय.