प्रभू येशूच्या आगमनाने वसईच्या उजळल्या दाही दिशा,नाताळचे सर्वत्र उत्साहात स्वागत

Krantee V. Kale

गोव्याच्या खालोखाल वसईत साजरा होणारा नाताळचा उत्साह यंदाही वसई-विरारच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून आला. गुरुवारी सकाळपासूनच चर्चमधून नटून-थटून बाहेर पडलेले ख्रिस्ती बांधव थवेच्या थवे आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते. | सर्व फोटो- अनिलराज रोकडे
ख्रिस्ती बांधवांचा पवित्र व आनंदाचा सण असलेल्या नाताळाला (ख्रिसमस) वसई-विरार परिसरात जल्लोषात सुरुवात झाली आहे.प्रभू येशूच्या जन्मोत्सवाच्या स्वागतासाठी संपूर्ण वसई नगरी सजली असून चर्च, घरे आणि सार्वजनिक चौकांत करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे.
हा उत्सव पुढील आठवडाभर अधिक रंगत जाऊन नववर्षाच्या स्वागतापर्यंत चालणार असून, यात ख्रिस्ती बांधवांसह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
वसईच्या ऐतिहासिक परंपरेनुसार नाताळचा सण येथे केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना (मिस्सा) आणि प्रभू येशू जन्माचा सोहळा भक्तिभावात पार पडला.
चर्चमध्ये उभारण्यात आलेले भव्य ‘नाताळ गोठे’ व येशू जन्मावर आधारित देखावे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. नाताळनिमित्त बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. विविध प्रकारचे केक, पेस्ट्री तसेच पारंपरिक ‘कुसवार’ (नाताळची मिठाई) खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांत गर्दी केली आहे.
ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजच्या टोप्या, चांदण्या, लाईटिंग साहित्य व भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वसईतील मुख्य रस्ते, झाडे आणि ऐतिहासिक वास्तूंवर करण्यात आलेली आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांनीही वसईकडे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी चर्चमध्ये उभारलेले भव्य 'नाताळ गोठे' आणि येशू जन्मावर आधारित देखावे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
वसईच्या पश्चिम पट्ट्यात पारंपरिक वेषभूषेतील मिरवणुका आणि ‘ख्रिसमस कार्निव्हल’ची सुरुवात झाली आहे. स्थानिक तरुण मंडळींकडून कॅरल गायन, वाद्यांच्या तालावर प्रभू येशूचा प्रेम, शांतता व बंधुभावाचा संदेश घराघरात पोहोचवला जात आहे. अनेक ठिकाणी सामाजिक संदेश देणारे देखावे व सांस्कृतिक उपक्रमही राबवले जात आहेत.