वसई-विरारमध्ये नाताळची जोरदार तयारी; घर-बंगले, चर्च आणि वाड्यांतून ख्रिसमसची धूम

Krantee V. Kale

ख्रिश्चन धर्मीयांचा मोठा सण असलेला नाताळ सण आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. हा नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ख्रिश्चन धर्मीयांच्या घरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. | सर्व फोटो- अनिलराज रोकडे
‘‘मिनी गोवा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत सध्या नाताळची लगबग सुरू झाली असून, त्या अनुषंगिक चीजवस्तू आणि शोभेच्या साहित्यांनी बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत.दुकानदार-व्यावसायिक व ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अवघ्या आठवडाभरावर आलेल्या नाताळाच्या पार्श्वभूमीवर हा सण अध्यात्म, भक्ती व श्रद्धेसोबतच आनंद, उल्हास आणि एकंदर जल्लोष घेऊन येणार असल्यामुळे त्यासाठी आता काऊंटडाऊन सुरू झाल्याचे चित्र वसईत उमटले आहे.
वसई धर्मप्रांतातील वाडा-भिवंडीपासून ते वसई-पालघर, मोखाडा-विक्रमगडपर्यंतच्या ३६ धर्मग्रामामधून नाताळच्या महिनाभर आधीपासूनच ख्रिस्त जन्मोत्सवाचे वेध लागून जातात.
घरा-घरात, बंगले आणि वाड्यांतूनही नाताळाच्या पूर्व तयारीला प्रारंभ झाला आहे. चर्चेसमध्ये महिनाभर आधीच्या चारही रविवारी वेगवेगळ्या रंगाच्या मेणबत्ती पेटवून नाताळाच्या आगमन कालाचा विधी सुरू होतो.
तिसऱ्या रविवारी म्हणजे काल गुलाबी रंगाची मेंढपाळाची मेणबत्ती सर्व चर्चेस मधून लावली गेली. ही आनंदाचे प्रतीक असते. चौथ्या, पुढील रविवारी देवदुताची मेणबत्ती लावली जाईल. ती शांतीचे प्रतीक मानली जाईल.
नाताळच्या आदल्या सायंकाळी म्हणजे दि. २४ डिसेंबर रोजी सफेद मेणबत्ती लावली जाते. ती बाळयेशूचे प्रतीक मानली जाते.
विविध गावे आणि वाड्यांमधून नाताळ सणाच्या शेवटच्या आठवडाभरात छोट्या मोठ्या कार्निवल मिरवणुका काढल्या जातात. त्यांची पूर्वतयारी आता जोरात सुरू आहे.
सांताक्लॉजचे लहान-मोठे आणि देशी-परदेशी बनावटीचे रंगीबिरंगी बाहुले, ख्रिसमस-ट्री, जिंगल बेल, कागदी व प्लास्टिकच्या स्टार सोबतच लाकडी स्टार, विविध स्वरूपातील चॉकलेट बॅगा, म्युझिकल लाइट, ग्रिटींग कार्ड‌्स, डोअर-मॅट, वेलकम बॅनर, लाइटिंग-ट्री, स्नो इफेक्ट, ख्रिसमस ट्री, सिगिंग अँड डान्सिंग कॅप, इकोफ्रेडली कॅडल्स व स्टार्स अशा शेकडो नाताळाच्या चीज वस्तूंनी बाजारपेठा गजबजल्या आहेत.