मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)कडील सोने साठ्याने ऑक्टोबरमध्ये ८८२ टनांचा उच्चांक गाठला, कारण रिझर्व्ह बँकेने या महिन्यात २८ टन सोने खरेदी केले, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (डब्ल्यूजीसी) भारत विभागाच्या संशोधन प्रमुख कविता चाको यांनी एका निवेदामध्ये नमूद केले. नोव्हेंबर २००९ नंतर ही दुसरी सर्वाधिक मासिक सोने खरेदी आहे.
आरबीआयने २०२४ मध्ये आतापर्यंत ७८ टन सोने खरेदी केले आहे. ही खरेदी २००९ च्या २५७ टनांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाची वार्षिक सोने खरेदी आहे. मूल्याच्या दृष्टीने, सोने आता एकूण विदेशी चलन साठ्याच्या १० टक्के इतके आहे, जे १९९९ नंतरची सर्वाधिक टक्केवारी आहे, असे चाको म्हणाल्या.
आरबीआयच्या ऑक्टोबरच्या बुलेटिननुसार, बँकेने सप्टेंबरमध्ये ४.६६ टन सोने खरेदी केले. भारताकडे जगातील नवव्या क्रमांकाचा अधिकृत सोने साठा आहे, ज्यामध्ये स्वित्झर्लंडकडील १,०४० टन साठ्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
८ नोव्हेंबरपर्यंत आरबीआयच्या एकूण परकीय चलन साठ्याच्या १० टक्के हिस्सा सोन्याचा होता, असे आरबीआयच्या आकडेवारीत दिसून आले. २०२४ मध्ये सोने खरेदी करणाऱ्या अन्य प्रमुख मध्यवर्ती बँकांमध्ये पोलंडची नॅशनल बँक, तुर्कस्तानची मध्यवर्ती बँक आणि चीनची पीपल्स बँक यांचा समावेश आहे.
सप्टेंबरच्या शेवटी आरबीआयच्या एकूण सोने साठ्यापैकी ६० टक्के म्हणजे ५१०.४६ टन, देशातच ठेवले गेले, जे मार्चपासून १०२ टनांनी वाढले आहे. मार्च २०२३ च्या तुलनेत सोने साठ्यात ३८ टक्के वाढ झाली आहे. आरबीआय आपले सोने साठे देशात ठेवण्यावर भर देत आहे आणि बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे ठेवलेला साठा कमी केला आहे.