
मराठी नाट्यक्षेत्रातील जेष्ठ नाट्यकर्ते, अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचे आज पहाटे निधन झाले. राहत्या घरीच पहाटे ३ वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीत शोककळा पसरली आहे. अजित भगत म्हणजे चालते बोलते नाट्यविद्यापीठ होते. आर्य चाणक्य, जांभूळ आख्यान, सगेसोयरे, रोमन साम्राज्याची पडझड, मुंबईचे कावळे, जय जय रघुवीर समर्थ, झाला अनंत हनुमान, अरण्य-किरण अशा नाटकांचे दिग्दर्शन प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली अनेक नाटके अजित सरांनी दिग्दर्शित केली.
अजित भगत यांनी नाट्य दिग्दर्शनासोबतच अभिनय केला आहे. मॅड मॅड मर्डर, एक वाडा झपाटलेला अशा मालिकेमध्ये काम केले. तसेच पंडित सत्यदेव दुबेजीच्या 'इसापचा गॉगल' या नाटकातील त्यांनी साकारलेली भूमिका खास गाजली. तसेच, हिंदी चित्रपट कंपनी, मुंबई मेरी जान अशा हिंदी चित्रपटांमधेही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या जाण्यामुळे नाट्यसृष्टीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.