
अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant) अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राखीने अटकपूर्व जामीन फेटाळण्याच्या मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राखीवर शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात आंबोली पोलिसांनी राखीची चौकशी केली होती.
शर्लिन चोप्राने राखी सावंतवर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची दखल घेत आंबोली पोलिसांनी राखीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वारंवार प्रयत्न करूनही ती हजर नव्हती. त्यामुळे पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. राखी सावंतचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिला पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी राखीने आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना लग्नाची माहिती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.