बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनारी असलेल्या शिल्पा शेट्टीच्या घराला बाहेरील व्यक्ती भेट देऊ शकत नाही. तिच्या घराभोवती 24 तास सुरक्षा असते. त्यानंतरही दोन चोरटे समुद्रातून 25 फूट बाउंड्री वॉलवर चढून शिल्पा शेट्टीच्या घरी गेले. शिवाय लाखो रुपये चोरून तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. जुहू पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीची घटना उघडकीस आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जुहू पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरातून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली आहे.
आरोपी अजय चित्ता (वय २२ वर्षे) याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत. अर्जुन देवेंद्र (वय २६ वर्षे) याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. या दोघांनाही पोलिसांनी नेहरू नगर विलेपार्ले पश्चिम, मुंबई येथून अटक केली आहे. शिल्पा शेट्टीच्या घरातून चोरी करून दोघेही मुंबई सोडण्याच्या प्रयत्नात होते. मात्र ते पळून जाण्यापूर्वीच जुहू पोलिसांनी दोघांना अटक केली.