
उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातील पटियाली भागात बोलेरो आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तिथून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बोलेरो आणि टेम्पोमध्ये एकूण १८ जण प्रवास करत होते.
बोलेरोतील प्रवासी कायमगंज येथून भोले बाबा सत्संगमध्ये सहभागी होण्यासाठी बहादुर नगर येथे जात होते. याचदरम्यान, पटियाली क्षेत्राच्या अशोकपूर महामार्गावर वेगाने जाणाऱ्या बोलेरो आणि टेम्पोमध्ये समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातातील एका महिलेसह आठ गंभीर जखमींना उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले.