वॉशिंग्टन : भारतात लोकसभा निवडणूक होण्याच्या आधी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रयत्न करत असून त्यांच्यासमोर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारतीय वंशाचे रिपब्लिक पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचे तगडे आव्हान आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका मुद्द्यामुळे त्यांच्यासमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. बायडन यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्यावर बेकायदा शस्त्र खरेदीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी आगामी निवडणुकीत बायडेन यांच्या विरोधकांकडून या मुद्द्यावर ते घेरले जाण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर आधीच महाभियोग चालवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणी दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या मुलावर अशा प्रकारे गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही अमेरिकेतली पहिलीच वेळ आहे. याआधी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याचे उघड झाले होते. त्यापाठोपाठ हंटर बायडेन यांचे प्रकरण समोर आल्यामुळे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्यावर अमेरिकेच्या डेलवेअर न्यायालयात सध्या खटला सुरू आहे. त्यांच्यावर २०१८साली ऑक्टोबरमध्ये चुकीची माहिती देऊन शस्त्र मिळवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी कोल्टा कोब्रा गन खरेदी केली होती. आपण बेकायदा अमली पदार्थ घेत असल्याचे त्यांनी शस्त्र विक्रेत्यापासून लपवून शस्त्र मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकारावर आत्ता निवडणुकीच्या काही महिने आधी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा मुद्दाही अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरू लागला आहे. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी संसदेमध्ये हंटर बायडेन यांच्या विदेशी व्यावसायिक करारांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत थेट जो बायडेन यांच्याविरोधातच महाभियोग आणण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा अध्यक्षांविरोधातला जाणीवपूर्वक करण्यात आलेला डाव ठरवत तो फेटाळून लावला आहे.