प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने सैनिक वाढवले

चीनने सीमेवर पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे
प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने सैनिक वाढवले

बीजिंग : भारत आणि चीनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून सैन्य मागे घेतल्याचे दावे चीन करत आहे. पण, ते दावे खोटे असल्याचे पेंटागॉनच्या अहवालात नमूद केले आहे. चीनने गेल्या वर्षभरापासून भारताला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर मोठ्या प्रमाणावर सैनिकांची संख्या वाढवली असल्याचा खळबळजनक अहवाल पेंटागॉनने दिला आहे.

चीनने सीमेवर पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे. त्यात भुयारी साठवणूक सुविधा, रस्ते, विमानांसाठी धावपट्टी, हेलिपॅड उभारले आहेत. तसेच चीनने आण्विक क्षमता वाढवली आहे. सध्या चीनकडे ५०० अण्वस्त्र आहेत. येत्या २०३० पर्यंत अण्वस्त्रांची संख्या हजारावर नेण्याचे चीनने ठरवले आहे. त्याचबरोबरच चीनने आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

अमेरिकेकडे ३७५० क्रियाशील अण्वस्त्रांसोबतच ५२४४ अण्वस्त्र आहेत. रशियाकडे ५८८९, भारताकडे १६४, तर पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे आहे. चीन आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण करत आहे. जमीन, हवाई, समुद्र, अण्वस्त्र, अंतराळ, अंतराळविरोधी, इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर, सायबरस्पेस आदी क्षेत्रात चीन मोठी प्रगती करत आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०४९ पर्यंत जगातील सर्वोत्तम लष्कर उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे. चीनने ३४८८ किमीच्या सीमेवर यंदा मोठ्या प्रमाणावर सैनिकांची तैनाती वाढवली आहे. चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल असून त्यांच्याकडे ३७० युद्धनौका व १४० लढाऊ जहाजे आहेत. गेल्यावर्षी चीनने ‘फुजियान’ या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण केले. चीनने अंतराळविरोधी क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले. उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र तयार केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in