
रियाध : भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याच्या चर्चा जोरात सुरू असतानाच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ९०.२१ डॉलर्स प्रति पिंप झाल्या आहेत. गेल्या ११ महिन्यांत पहिल्यांदाच कच्चे तेल ९० डॉलर्सच्या वर गेले आहे. यामुळे आता स्वस्त पेट्रोलवर पाणी फिरवले जाणार आहे.
आखाती देशांपासून न्यूयॉर्कपर्यंत गेल्या दहा दिवसांत कच्च्या तेलाचे दर ९ टक्के वाढले आहे. त्यामुळे भारतात स्वस्त पेट्रोल-डिझेल देणे अशक्य बनेल.
दर दिवशी १.३ दशलक्ष पिंप कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या योजनेला तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय सौदी अरेबिया व रशियाने मंगळवारी घेतला. येत्या डिसेंबरपर्यंत ही उत्पादन कपात लागू असेल. त्याबरोबर जगात तेलाच्या दरात १ टक्के वाढ झाली. त्यामुळे जगात कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची चिन्हे आहेत.
ब्रेंट क्रूड तेलाचे दर ९०.२१ डॉलर्स प्रति पिंपावर पोहोचले आहेत. भारत सरकारला वाटते की, तेलाचे दर ९० डॉलर्सपेक्षा कमी राहावेत. मात्र सौदी अरेबिया व रशियाला कच्च्या तेलाच्या दरात वाढ हवी आहे. डॉलर्स इंडेक्सच्या घसरणीचा फायदा कच्च्या तेलाला मिळाला आहे.