जकार्ता : इंडोनेशियाच्या पूर्व भागात बुधवारी अनेक शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाने त्यात मोठे नुकसान किंवा जीवितहानीचे वृत्त नाही.
पूर्व इंडोनेशियाच्या विरळ लोकवस्ती असलेल्या बेटांच्या साखळीला बुधवारी भूकांपाने हादरवले. अमेरिकी जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे की, ६.९ रिश्चर क्षमतेचा भूकंप झाला. मलुकू प्रांतातील तूल या किनारपट्टीच्या शहराच्या नैऋत्येला ३४१ किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या पोटात १० किमी खोलीवर त्याचे केंद्र होते. त्यानंतर त्याच भागात आणखी ७.० रिश्चर क्षमतेचा भूकंप आणि ५.१ रिश्चर क्षमतेचे दोन धक्के जाणवले. इंडोनेशियाच्या हवामानशास्त्र विभागाने त्सुनामीचा धोका नसल्याचे म्हटले आहे. मात्र, पुन्हा काही कमी क्षमतेचे भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता वर्तवली.
तनिंबर बेटावरील गावकऱ्यांनी काही मिनिटांसाठी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. सुमारे १,२७,००० लोकसंख्या असलेल्या तनिंबर बेटांजवळील बांदा समुद्रात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. इंडोनेशियाच्या आचे प्रांतात २००४ मध्ये ९.१ रिश्चर क्षमतेच्या भूकंपामुळे हिंदी महासागर परिसरात त्सुनामी आली होती. त्यात डझनभर देशांमध्ये २,३०,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले होते.