
वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अमेरिकी उद्योगपती एलॉन मस्क मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा लोगो बदलणार आहेत. उद्यापासून यात बदल होईल. ते लोगो ‘एक्स’ करतील, असा अंदाज आहे. याबाबत ग्रेग नावाच्या युजरसोबत ट्विटर स्पेसवर झालेल्या संभाषणात मस्क यांनी यास दुजोरा दिला आहे. जेव्हा मस्क यांना विचारण्यात आले की, ते खरोखरच ट्विटरचा लोगो बदलणार आहेत का, तेव्हा त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.
याचवेळी त्यांनी ट्विटरवर एक पोल तयार केला आणि लिहिले की, ‘डिफॉल्ट प्लॅटफॉर्मचा रंग ब्लॅक करायचा का.’ दुपारी १२ वाजेपर्यंत या मतदानात ४.५० लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. बहुतेक लोकांनी आतापर्यंत काळा आणि पांढरा यातील काळा निवडला आहे. १९९९ पासून एलॉन मस्क ‘एक्स’ अक्षराशी संबंधित आहे. तेव्हा त्यांची एक कंपनी एक्स.कॉम या नावाची होती. मस्क यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ट्विटरचा लोगो एक्स मध्ये बदलताना दिसत आहे. यासोबतच त्यांनी लिहिले की, ‘आज रात्री एक चांगला एक्स लोगो पोस्ट केला गेला, तर आम्ही तो उद्या जगभरात लाइव्ह करू.’ मस्क यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले- ‘लवकरच आम्ही ट्विटर ब्रँडला आणि हळूहळू सर्व पक्ष्यांना निरोप देऊ.’
नवीन लोगो एक्सच का ?
एलॉन मस्क यांचा एक्स अक्षराशी संबंध १९९९ सालापासून आहे. तेव्हा त्यांनी एक्स.कॉम नावाची ऑनलाईन बँकिंग कंपनी तयार केली. नंतर त्यांनी ती पेपाल बनलेल्या दुसऱ्या कंपनीत विलीन केली. २०१७ मध्ये मस्क यांनी पेपालकडून यूआरएल "एक्स.कॉम" पुन्हा खरेदी केली. त्यांनी ट्विट केले की, डोमेन त्यांच्यासाठी "उत्तम भावनात्मक मूल्य" आहे. त्याचवेळी जेव्हा एलॉन मस्क यांनी लिंडा याकिरानो यांना ट्विटरची नवीन सीईओ बनवले, तेव्हा त्यांनी ट्विट केले की, या प्लॅटफॉर्मचे एक्स, एव्हरीथिंग अॅपमध्ये रूपांतर करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहे. एक्स त्यांची दुसरी कंपनी स्पेसएक्स मध्येदेखील दिसून येत आहे. २०२० मध्ये मस्क यांनी त्यांच्या एका मुलाचे नाव एक्स Æए-१२ मस्क ठेवले.