पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला दंड

स्थानिक पोलिसांनी तिला आंदोलनाची जागा बदलण्याचे आदेश दिले
पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला दंड

माल्मो : आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला पोलिसांचा आदेश मोडल्याबद्दल स्वीडनमधील न्यायालयाने दंड ठोठावला आहे. जागतिक नेत्यांनी पर्यावरण रक्षणासाठी तातडीने प्रयत्न करावेत, या मागणीसाठी ग्रेटाने २०१८ साली, वयाच्या १५ व्या वर्षी, स्वीडनच्या संसदेबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर तिला जगभर प्रसिद्धी मिळाली. तसेच शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी तिचे पाच वेळा नामांकन झाले होते. ग्रेटाने गेल्या महिन्यात स्वीडनमधील माल्मो शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी तिला आंदोलनाची जागा बदलण्याचे आदेश दिले होते. मात्र, ग्रेटाने ते आदेश पाळले नसल्याने माल्मो येथील न्यायालयाने सोमवारी तिला १५०० स्वीडिश क्रोनरचा (११४ डॉलर्स) दंड ठोठावला. तसेच, विविध गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या मदतनिधीसाठी १००० क्रोनर भरण्याचा आदेश दिला. पोलिसांच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे ग्रेटाने मान्य केले. मात्र, त्यात आपण काही गुन्हा केला नसल्याचे तिने म्हटले आहे. जागतिक हवामानबदलाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करणे भाग पडले, असा युक्तिवाद ग्रेटाने केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in