तेल अवीव : अमेरिकेने दिलेला सबुरीचा सल्ला धुडकावून इस्रायलने गाझातील हल्ले आणखी तीव्र करण्याची तयारी चालवली आहे. तुमचा आणि तुमच्या प्रियजनांचा जीव प्यारा असेल, तर गाझा पट्टीच्या दक्षिणेकडे चालू लागा, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांनी गाझातील पॅलेस्टिनींना दिला आहे. तसेच सध्या आमचा युद्ध थांबवण्याचा कोणताही विचार नसून हमासने ओलीस ठेवलेल्या सर्व इस्रायली नागरिकांची सुटका होईपर्यंत युद्ध पूर्ण क्षमतेने सुरूच राहील, असा दृढविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शनिवारी इस्रायलने गाझा पट्टीतील जबालिया परिसरात संयुक्त राष्ट्रांतर्फे चालवण्यात येणाऱ्या अल-फाखुरा येथील एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला आणि किमान ५४ जण जखमी झाले. त्याबद्दल इस्रायलवर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी युद्ध चालू झाल्यापासून शुक्रवारी इस्रायलला तिसऱ्यांदा भेट दिली. तेथून ते शनिवारी जॉर्डन आणि तुर्कियेला रवाना झाले. ब्लिंकेन यांनीही नेतन्याहू यांना इशारा दिला की, मित्रदेशांची मदत सुरू राहावी असे वाटत असेल तर गाजा पट्टीतील मानवतावादी परिस्थिती सुधारा, पण अमेरिकेचा इशारा न जुमानता नेतन्याहू यांनी पूर्ण क्षमतेने लष्करी कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी म्हटले की, इस्रायलच्या गाझातील कारवाईनंतर आम्ही इस्रायलशी संबंध तोडत आहोत. नेतन्याहू यांच्याशी बोलावे, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही.
हमास प्रमुखाच्या घरावर हल्ला
इस्रायलच्या सेनादलांनी शनिवारी हमासचा प्रमुख इस्माईल हनिये याच्या घरावर हल्ला केला. गाजा पट्टीतील अल-शथी या ठिकाणी त्याचे घर असून त्यावर इस्रायलच्या ड्रोन्सनी क्षेपणास्त्र डागले. मात्र, या हल्ल्यात त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणी मारले गेले की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हनिये हा स्वत: २०१९ पासून कतारमध्ये आश्रयास गेला आहे. इस्रायलच्या सेनादलांनी गेल्या महिन्यात गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात हनियेच्या भावासह त्याचे १४ कुटुंबीय मारले गेले होते.