
विजेवरील दुचाकी वाहनांना आग लागण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्र्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य आणि प्रसिद्ध शास्रज्ञ व्ही. के. सारस्वत यांनी म्हटले आहे की, इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या बॅटरीसाठी आयात केलेले सेल भारतीय हवामानासाठी अनुकुल नसावेत. त्यामुळे बॅटरी सेलचे देशांतर्गत उत्पादन करावेत, यावर त्यांनी भर दिला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजेवरील दुचाकीच्या आगीच्या दुर्घटनांची चौकशी करण्यात येईल. तसेच त्रुटी असलेली वाहने बाजारातून परत घेण्यात यावीत, असे जाहीर केले होते. या पार्श्र्वभूमीवर सारस्वत यांच्या मताला मोठे महत्त्व आहे.
दरम्यान, देशात ई-वाहनांना वारंवार आग लागण्याच्या आणि बॅटरीमध्ये स्फोट होण्याच्या काही अनेक घटना समोर आल्या. त्याचे कारण शोधण्यासाठी केंद सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या सदोष सेलमुळे आगीच्या घटना घडत असल्याचे केंद्राने स्थापन केलेल्या चौकशी समितीला आढळून आले आहे. चौकशी समितीला देशातील जवळपास सर्वच विजेवरील दुचाकी आगीच्या घटनांमध्ये बॅटरी सेल किंवा डिझाइनमध्ये दोष आढळला आहे. हे सर्व पाहता नीती आयोगाच्या सदस्यांचे मत पाहता सरकार यासंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकते. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या बॅटरी सेलचे देशात उत्पादन वाढविण्यास चालना देऊ शकते.