
कान २०२२ फिल्म फेस्टिव्हल हा भारतासाठी महत्त्वाचा ठरला आहे. भारताला या महोत्सवात ‘कंट्री ऑफ ऑनर’चा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे यावर्षीपासूनच कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’ची परंपरा सुरू करण्यात आली आहे आणि हा बहुमान मिळवणारा भारत पहिला देश आहे. त्यामुळे कान महोत्सवाच्या निमित्ताने भारताला चित्रपट क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे. केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
प्रत्येक वर्षी हा मान मिळवणारा देश नवा असणार आहे. मात्र, या बहुमानाची सुरुवात भारतापासून झाली आहे. फ्रान्समधील कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील निवडक चित्रपट आणि माहितीपट दाखवले जातात. सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार दिले जातात.
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये एकूण सहा भारतीय भाषेतील चित्रपट दाखवले जाणार आहेत. यातील एक चित्रपट म्हणजे ‘रॉकेटरी - द नंबी इफेक्ट’. कान फेस्टिव्हलमधील भारताचा सहभाग गेल्या काही वर्षात वाढत आहे. त्यातच यंदा भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’चा मान मिळाल्याने भारताला नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.