
पी. व्ही. सिंधूसह अन्य खेळाडूही छाप पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय महिला संघाला दक्षिण कोरियाने ५-० अशी धुळ चारली. परंतु भारताने पहिले दोन सामने जिंकून आधीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले होते. त्यामुळे आता गुरुवारी त्यांच्यापुढे थायलंडचे आव्हान असेल.
बुधवारी झालेल्या ड-गटातील अखेरच्या साखळी लढतीपूर्वी भारताने अनुक्रमे कॅनडा आणि अमेरिका यांना नमवले होते. त्यामुळे भारताला गटातील अग्रस्थानासह आगेकूच करण्याची संधी होती. मात्र कोरियापुढे भारताचा निभाव लागला नाही.
* एकेरीच्या पहिल्या लढतीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या अॅन सेन यंगने दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूला २१-१५, २१-१४ असे सहज पराभूत केले.
* दुहेरीत शेन शेंगुचान आणि ली सोई यांनी भारताच्या शृती मिश्रा-सिमरन संघी जोडीवर २१-१३, २१-१२ असे वर्चस्व गाजवले.
* एकेरीच्या दुसऱ्या लढतीत किम यॉनने आकर्षी कश्यपवर २१-१०, २१-१० असे प्रभुत्व गाजवले.
* दुहेरीत्या दुसरी लढतीत किम आणि काँग हीयाँग यांनी तनिषा क्रॅस्टो-त्रिशा जॉली यांच्यावर २१-१४, २१-११ अशी मात केली.
* अखेरच्या लढतीत सिम युजीनने अश्मिता छलिहावर २१-१७, २१-१८ असा विजय मिळवून एकूण ५-० अशा फरकाने भारताला नमवले.