
जगातील सर्वात मोठा पामतेल उत्पादक इंडोनेशियाने या तेलावरील निर्यातबंदी उठवली आहे. कच्चे पाम तेल, खाद्यतेल, रिफाईन आदी प्रकारचे तेल निर्यात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. येत्या २३ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. इंडोनेशियातील पामतेलाचा पुरवठा सुरळीत झाल्याने व किमती नियंत्रित झाल्याने इंडोनेशियन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी सांगितले की, इंडोनेशियाच्या स्थानिक बाजारात पाम तेलाचा पुरवठा २११,००० टन झाला आहे. २८ एप्रिल रोजी बंदी घालण्यापूर्वी हा पुरवठा ६४ हजार टन अधिक आहे. देशातील पुरवठा सुरळीत झाला आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, इंडोनेशियाने पामतेलाची निर्यात थांबवल्याने पाम उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली. त्यामुळे पामतेलाच्या किंमती घसरल्या व पाम फळांचा पुरवठा वाढला.
इंडोनेशियाच्या वित्तमंत्री मुलयानी इंद्रावती म्हणाले की, पामतेलावर निर्यातबंदी केल्याने सरकारच्या महसुलात ४०७.३३ दशलक्ष डॉलर्स घट झाली.