तेहरान : इस्रायलचे गाझा पट्टीवरील हल्ले नियंत्रणाबाहेर चालले असून ते थांबले नाहीत तर संपूर्ण मध्य-पूर्वेतील परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते, असा गंभीर इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अब्दुल्लाहियन यांनी दिला आहे.
इस्रायलचे हल्ले प्रमाणाबाहेर चालले आहेत. ते वेळीच थांबले नाहीत तर केव्हाही, काहीही घडू शकते. त्याने संपूर्ण मध्य-पूर्वेतील परिस्थिती चिघळू शकते. इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मी अमेरिका आणि इस्रायल या दोघांनाही इशारा देतो की, त्यांनी गाझा पट्टीत चालवलेला वंशविच्छेद ताबडतोब थांबवला नाही, तर परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
इराण, हिजबुल्लाचे नामोनिशाण मिटवू
इराणचा पाठिंबा असलेल्या लेबॅननमधील हिजबुल्ला संघटनेने इस्रायलवर हल्ला केला, तर हिजबुल्ला आणि इराणच्या नेतृत्वाचे नामोनिशाण मिटवून टाकू, असा इशारा इस्रायलचे अर्थमंत्री नीर बरकत यांनी दिला आहे. इराणने इस्रायलविरुद्ध उत्तरेकडून आघाडी उघडली, तर इराणचे नेते अयातुल्ला शांतपणे झोपी जाऊ शकणार नाहीत. हिजबुल्लाच्या सापाचे डोके आम्ही कापून चिरडून टाकू, असा सज्जड दम नीर बरकत यांनी दिला.